शेतकऱ्यांनी कपाशीवर चालविला ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:31 IST2018-01-02T23:31:32+5:302018-01-02T23:31:43+5:30
नजीकच्या जामणी येथील शेतकरी आशीष मधुकर येणकर व मनीष सुधाकर येणकर यांनी गुलाबी बोंडअळीच्या थैमानाला कंटाळून व सर्वेक्षणाला होत असलेली टाळाटाळ लक्षात घेऊन अखेर उभ्या कपाशी पिकावर ट्रॅक्टर फिरविला.

शेतकऱ्यांनी कपाशीवर चालविला ट्रॅक्टर
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : नजीकच्या जामणी येथील शेतकरी आशीष मधुकर येणकर व मनीष सुधाकर येणकर यांनी गुलाबी बोंडअळीच्या थैमानाला कंटाळून व सर्वेक्षणाला होत असलेली टाळाटाळ लक्षात घेऊन अखेर उभ्या कपाशी पिकावर ट्रॅक्टर फिरविला.
सदर दोन्ही शेतकऱ्यांनी यंदा प्रत्येकी पाच एकरात कपाशीची लागवड केली होती. पिकाची योग्य निगा राखल्याने अल्पावधीत पिकही बहरले. परंतु, कापूस निघण्याच्या वेळी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला. दोन्ही शेतकऱ्यांचे गुलाबी बोंडअळीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून गत काही दिवसांपासून त्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण वारंवार माहिती देऊनही कृषी विभागाच्या संबंधीत कर्मचाऱ्याने न केल्याने अखेर दोन्ही शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या कपाशी पिकावर ट्रॅक्टर फिरविला. या भागातील अनेक कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे बोंडअळीने केलेल्या नुकसानीचे सर्वेक्षण अद्यापही कृषी विभागाने केले नसल्याची परिसरात ओरड आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.