शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 22:38 IST2017-11-17T22:37:33+5:302017-11-17T22:38:43+5:30
शेतमालाची काढणी सुरू झाल्याबरोबर शेतकऱ्याकडे निघालेला माल साठवणुकीसाठी जागेचा अभाव व आर्थिक अडचण राहत असल्याने तो बाजारात विक्रीसाठी आणावा लागतो.

शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शेतमालाची काढणी सुरू झाल्याबरोबर शेतकऱ्याकडे निघालेला माल साठवणुकीसाठी जागेचा अभाव व आर्थिक अडचण राहत असल्याने तो बाजारात विक्रीसाठी आणावा लागतो. बाजारपेठेत शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यास भावही योग्य मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन सन १९९२ पासून बाजार समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र कृषी पणन मंडळातर्फे शेतमाल तारण कर्ज योजना राबविली जात आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन अॅड. सुधीर कोठारी यांनी केले.
हिंगणघाट बाजार समितीच्या आवारात आयोजित शेतमाल तारण योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिष वडतकर, संचालक उत्तम भोयर, ओमप्रकाश डालीया, मधुकर डंभारे, मधुसुदन हरणे, अशोक उपासे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी शेतकरी रितेश तळवेकर रा. सिंदी (रेल्वे) यांचा सत्कार करण्यात आला.
कृउबासचे सभापती अॅड. सुधीर कोठारी पुढे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना पैशाची अडचण आहे, पण माल विकायचा नाही तसेच माल साठवणुकीसाठी घरी जागेचा अभाव आहे, अशा शेतकºयांनी आपला शेतमाल वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठवणूक करावा. साठवणुकीच्या दिवशी सदर मालाचे बाजारातील दर लक्षात घेता वखार पावतीवर ७० टक्केपर्यंत बाजार समितीमार्फत तारण कर्ज अग्रीम दिल्या जाते. वखार पावतीवर बाजार समितीमार्फत दिलेले तारण कर्ज शेतकऱ्यांनी सहा महिन्याचे आत समितीला जमा केल्यास वखार महामंडळाच्या गोदाम भाड्याची अर्धी रक्कम समितीमार्फत संबंधित शेतकºयाला परत करण्यात येते. वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठवणूक केलेल्या मालाची शेतकरी स्वत: विक्री करू शकतो. तर बाजार समिती हिंगणघाट येथील गोदामात केवळ सोयाबीन या शेतमालाची साठवणूक करण्यात येत आहे. त्यावर ७० टक्के तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यात शेतकºयाला गोदाम भाडे, हमालीचा खर्च लागत नाही. तो बाजार समिती करते. शिवाय शेतमालाची विक्रीही बाजार समितीमार्फत केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला अशोक उपासे, विनोद वानखेडे, सुरेश सातोकर, बळीराम नासर, संजय तपासे, राजेश मंगेकर, सुरेश वैद्य, बापुराव महाजन, शेषकुमार येरलेकर, पंकज कोचर, राजेश कोचर, सुरेखा सायंकार, माधुरी चंदनखेडे, संजय कातरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव टी. सी. चांभारे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांनी शेतकºयांना सदर योजनेची सोप्या शब्दात माहिती दिली.