विद्यार्थ्यांनी मध्येच शिक्षण सोडू नये, राज्यपालांचे आदिवासी मुलांना भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 03:19 PM2018-10-13T15:19:39+5:302018-10-13T15:25:18+5:30

आदिवासी सेवा मंडळाच्या शहापूर तालुक्यातील गोटेघर वाफे आश्रमशाळा येथे साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या अर्थसहाय्यातून बांधण्यात आलेल्या दोन वसतीगृह इमारतींच्या तसेच भोजन कक्षाला

Students should not be left in the school, vidyasagar rao emotional appeals to the tribal childrens | विद्यार्थ्यांनी मध्येच शिक्षण सोडू नये, राज्यपालांचे आदिवासी मुलांना भावनिक आवाहन

विद्यार्थ्यांनी मध्येच शिक्षण सोडू नये, राज्यपालांचे आदिवासी मुलांना भावनिक आवाहन

Next

ठाणे - आदिवासी समाजाच्या विकासाकरिता शासन विविध योजना राबवित आहे. या योजनांसाठी निधीची कमतरता नाही. खासगी कंपन्यादेखील आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून या कामांना सहकार्य करण्यास तयार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रकल्पांना गती मिळणे आवश्यक असून ठाणे जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्पांना तातडीने पूर्ण करण्यासाठी लवकरच सर्व संबंधितांची बैठक राजभवन येथे आयोजित करण्यात येईल, असे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सांगितले.

आदिवासी सेवा मंडळाच्या शहापूर तालुक्यातील गोटेघर वाफे आश्रमशाळा येथे साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या अर्थसहाय्यातून बांधण्यात आलेल्या दोन वसतीगृह इमारतींच्या तसेच भोजन कक्षाला भेट देऊन त्यांची राज्यपालांनी पाहणी केली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
आदिवासी विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षणासमवेत विविध कौशल्ये देखील आत्मसात करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून स्वावलंबी होता येईल, असे सांगून राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आदिवासी मुलांना शिक्षण न सोडण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे आपले भाषण राज्यपालांनी मराठीत केले. आश्रमशाळा आणि वसतिगृहाचे कौतुक करून इतकी सुंदर, सुसज्ज आणि हिरवीगार आश्रम शाळा मी आज पहिल्यांदा पाहिली असे ते म्हणाले. मला मराठी चांगले येत नाही. अजूनही शिकत आहे. पण मी हळू हळू बोलण्याचा प्रयत्न करणार आहे, असे म्हणत त्यांनी सर्वाना सुखद असा धक्का दिला.

राज्यपाल म्हणाले की, साडेचार कोटी रुपये खर्च करून संस्थेने आश्रमशाळेचा कायापालट केला आहे. साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. शंकर यांनी हे फार मोठे कार्य केले आहे. भारत हा निसर्ग-संपदेने नटलेला देश असून या संपदेचे रक्षण आदिवासी समाजाने केले आहे. राज्यघटनेच्या शेड्यूल पाच नुसार आदिवासी भागांच्या विकासाचे पालकत्व माझ्याकडे आहे, त्यानुसार राज्यपाल या नात्याने आपण ग्राम पंचायतींना आदिवासी योजनेतील पाच टक्के निधी थेट मिळवून दिला आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार स्वच्छ भारत कार्यक्रमात सहभागी होऊन आपला परिसर, आपले गाव स्वच्छ राहिले पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी जेवणापूर्वी हात धुवून वैयक्तिक स्वच्छता राखण्याचे आवाहन त्यांनी केले. या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी कर्तृत्वाने मोठा झाला पाहिजे असे सांगून राज्यपालांनी विद्यार्थ्यांना धनुर्विद्येचे प्रशिक्षण देण्याची सूचना केली. त्यासाठी लागणारे साहित्य स्वत: उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. भारताच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक देश योग दिवस साजरा करीत आहेत, येथील विद्यार्थ्यांनीही नियमित योग करावेत, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून, तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहनही केले.
या कार्यक्रमास खासदार कपिल पाटील, आमदार पांडुरंग बरोरा, विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्यासह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: Students should not be left in the school, vidyasagar rao emotional appeals to the tribal childrens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.