मिसिंग लिंकचे काम आवश्यक, ठाणे महापालिकेची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 02:24 AM2018-08-06T02:24:05+5:302018-08-06T02:24:22+5:30

घोडबंदर भागात आता मेट्रोच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे; परंतु हे काम करताना येथील वाहतूककोंडीवर मात करण्याचे मुख्य आव्हान पालिकेसह इतर सर्वच यंत्रणांसमोर उभे ठाकणार आहे.

Requires Missing Link Work, Thane Municipal Examination | मिसिंग लिंकचे काम आवश्यक, ठाणे महापालिकेची परीक्षा

मिसिंग लिंकचे काम आवश्यक, ठाणे महापालिकेची परीक्षा

googlenewsNext

- अजित मांडके 
ठाणे : घोडबंदर भागात आता मेट्रोच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे; परंतु हे काम करताना येथील वाहतूककोंडीवर मात करण्याचे मुख्य आव्हान पालिकेसह इतर सर्वच यंत्रणांसमोर उभे ठाकणार आहे. यावर उपाय म्हणून या भागातील मिसिंग लिंक विकसित केल्यास वाहतूक कोंडी सोडवण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय कोस्टल रोड आणि फूट हिल रोडसुद्धा विकसित केल्यास भविष्यात घोडबंदरकरांना वाहतूककोंडीचा सामना कमी प्रमाणात करावा लागेल. मेट्रोच्या कामाचा विचार करता, त्यावर आताच उपाययोजना होणे अपेक्षित आहे.
शहराचा विकास झपाट्याने होत आहे. विकासकामांनाही आता सुरुवात झाली आहे. आनंदाची बाब म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून ज्या कासारवडवली ते वडाळा मेट्रोची प्रतीक्षा ठाणेकर करत होते, त्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, पावसाळा आणि रस्त्यावर सुरू झालेले काम पाहता नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. सध्या वाहतूक नियंत्रण कक्षाने रिलायन्स एजन्सीला मातीपरीक्षणासाठी रस्त्यामध्ये बॅरिकेड्स बांधण्याची परवानगी १ आॅक्टोबरपर्यंत दिली आहे. १ आॅक्टोबरनंतर एमएमआरडीएच्या विनंतीवरून पुढील किमान तीन वर्षे मेट्रोच्या कामासाठी परवानगी देण्यात येणार आहे. ठाणेकरांसाठी ही आनंदाची बातमी असली, तरी त्यामुळे वाहतूककोंडीचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. आजही घोडबंदरवर एक वाहन नादुरूस्त पडले, तरी मोठी कोंडी होते. त्यामुळे कासारवडवली ते वडाळा या मेट्रोमार्गाचे काम सुरू झाल्यास होणाऱ्या वाहतूककोंडीवर आताच उपाययोजना होणे गरजेचे आहे. येथील रस्ता चारपदरी असला तरी मेट्रोच्या कामामुळे ही कोंडी वाढणार आहे. त्यामुळे आता येथील मिसिंग लिंक विकसित करण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर उभे ठाकले आहे.
>अवजड वाहने परस्पर शहराबाहेर काढणे शक्य
वाघबीळ-वसंतलीला ते हिरानंदानी मिसिंग लिंक रस्त्याची लांबी २५०, रुंदी ४० मी., हिरानंदानी ते तुर्पेपाडा तलाव मिसिंग लिंक रस्ता - २०० मी लांबी, २० मी. रुंदी, गुडलॅस नेरोलॅक पेंट कंपनीसमोरून कावेसर तलाव - ९०० मी. लांबी, २० मी. रुंदी, सरस्वती शाळा ते वाघबीळ यामधील मिसिंग लिंक रस्त्यातील प्राथमिक शाळा ते गुडलॅस नेरोलॅक पेंट - ४०० मी. लांबी, रुंदी ३० मी., आनंदनगर ते वाघबीळ येथून येणारे रस्ते - १३०० मी. लांबी, ३० मी. रुंदी, घोडबंदर रोड ते वाघबीळपर्यंतचा रस्ता - २१०० मी. लांबी, ४० मी. रुंदी, कोलशेत रस्त्याचे ढोकाळीनाका ते क्लिरियंट कं. जंक्शनपर्यंत बांधकाम - ३००० मी. लांबी, ४० मी. रुंदी, राममारुतीनगर रस्त्याचे रुंदीकरण - ११५० मी. लांबी, ३० मी. रुंदी, तरीचापाडा डी.पी. रस्ता विकसित करणे - ७५० मी. लांबी, २० मी. रुंदी, तलाव पार्क आरक्षण डी.पी. रस्ता - ७५० मी. लांबी, ४० मी. रुंदी अशा प्रकारे रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.ब्रह्मांड मिसिंग लिंकचे काम पावसाळ्यानंतर पूर्ण होणार आहे. हा रस्ता कोलशेतपर्यंत जातो. त्यामुळे घोडबंदरकडील वाहतूक थेट यामार्गे जेएनपीटी, विटावा, कळवा येथेही जाऊ शकणार आहे. हाइड पार्क, तुळशीधाम, काशिनाथ घाणेकर येथील रस्त्यांसह कासारवडली, वेदान्त हॉस्पिटल येथील रस्त्याचे कामही सुरू होणार आहे. सरस्वती ज्युनिअर कॉलेज ते कासारवडवली रस्त्याची वर्कआॅर्डर दिली आहे. हे संपूर्ण मिसिंग लिंक ५ ते १० किमीचे असणार असून या लिंकमुळे मुख्य रस्ते अनेक ठिकाणी जोडले जाणार आहेत. त्यामुळे मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर या मिसिंग लिंकचा फायदा अवजड वाहने परस्पर बाहेर काढण्यासाठी होणार आहे.
>खारीगाव ते गायमुख कोस्टल रोडला चालना देणे गरजेचे
इतर ठिकाणांहून ठाण्यात प्रवेश करताना तसेच मुंबईहून ठाण्याच्या बाहेर जाताना घोडबंदर रोडवर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित खारीगाव-गायमुख कोस्टल रोडच्या मार्गाला पर्यावरण विभाग आणि संरक्षण खात्याने मंजुरी दिली आहे. मात्र, १२ किमी लांबीचा खाडीपूल आणि ५०० मीटरचा बोगदा अशा पद्धतीने या रस्त्याची उभारणी करण्याची सक्ती असल्याने या मार्गाचा खर्च ३०० कोटींवरून एक हजार कोटींवर गेला आहे. आयुक्तांनी लक्ष घातले, तर हा मार्ग सुकर होईल.
>श्रीनगर ते गायमुख फूट हिल रस्ता काळाची गरज
ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि घोडबंदरवरील वाहतूककोडींला पर्याय मिळावा, म्हणून घोडबंदर रोडला समांतर रस्ता तयार करण्याचा निर्णय आठ वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. त्यानुसार, श्रीनगर ते गायमुख या डीपी रोडचा पर्याय पुढे आला. परंतु, यामध्ये असलेली बांधकामे आणि वनविभागाची जागा यामुळे हा रस्ता पालिकेच्या दप्तरी जमा झाला होता.
आठ वर्षांनंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या रस्त्याच्या कामासाठी नव्याने हालचाली सुरू केल्या असून लवकरच त्याच्या सर्व्हेलाही सुरुवात केली जाणार आहे. या रस्त्याच्या कामात अनेक अडचणी असून त्या सोडवण्यासाठी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
हा रस्ता फूट हिल रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. तो ४० मीटर रु ंद आणि ६ किलोमीटर लांबीचा असून या रस्त्याने घोडबंदर रोडवरील कासारवडवली किंवा गायमुख बायपासपर्यंत जाता येणार आहे. त्यामुळे केवळ घोडबंदरच नव्हे तर ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूककोंडीदेखील कमी होणार आहे.

Web Title: Requires Missing Link Work, Thane Municipal Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.