केळकरांच्या मतदारसंघात लेलेंचे शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 03:32 AM2018-12-27T03:32:07+5:302018-12-27T03:32:27+5:30

एकीकडे ठाणे शहरात मुख्यमंत्री येणार, याची कल्पना पोलिसांना जशी नव्हती, तशीच ती भाजपाच्या आमदारांसह इतर काही प्रमुख मंडळींनासुद्धा नसल्याची बाब समोर आली आहे.

 Power show in Kelkar constituency | केळकरांच्या मतदारसंघात लेलेंचे शक्तिप्रदर्शन

केळकरांच्या मतदारसंघात लेलेंचे शक्तिप्रदर्शन

googlenewsNext

ठाणे : एकीकडे ठाणे शहरात मुख्यमंत्री येणार, याची कल्पना पोलिसांना जशी नव्हती, तशीच ती भाजपाच्या आमदारांसह इतर काही प्रमुख मंडळींनासुद्धा नसल्याची बाब समोर आली आहे. या माध्यमातून एक प्रकारे आमदार संजय केळकरांच्या मतदारसंघात भाजपा शहराध्यक्ष संदीप लेले यांनी शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा मात्र यानिमित्ताने चांगलीच रंगली आहे.

अपेक्षेप्रमाणे ठाणे विधानसभा मतदारसंघात निवडणुकीअगोदरच राजकीय फटाके वाजू लागले आहेत. याची सर्वात मोठी कोंडी आमदार केळकरांची झाल्याचे दिसून येत आहे. भाजपा शहराध्यक्ष लेले यांनी मंगळवारी ठाण्यातच उघडउघड युक्तीने शक्तिप्रदर्शन करून त्यांच्यासमोर अकस्मात आव्हान उभे केले आहे.

ठाणे शहर सेनेचा बालेकिल्ला केळकरांनी सर करून भाजपाचा झेंडा रोवला होता. सेनेला ही गोष्ट काळजात खीळ मारल्यासारखी आजही दुखत आहे. केळकरांनी पाच वर्षे कामांचा सपाटाही लावला आणि ते पुन्हा वनसाइड झाले होते. मात्र, लेलेंनी मंगळवारी अटल महोत्सवाच्या नावावर मोठ्या युक्तीने त्यांना अंधारात ठेवून थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच एकाच खुर्चीला खुर्ची लावून ठाणे मतदारसंघात केळकरांना कोपऱ्यात सरकवून शक्तिप्रदर्शन केले.

मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी जोपर्यंत होते, तोपर्यंत केळकरही तेथे हजर होते. परंतु, मुख्यमंत्र्यांनी तेथून निरोप घेताच केळकर यांनीही तेथून काढता पाय घेतला. खरेतर, लेले हे मागच्या वेळेस कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर निवडणूक लढले होते. मात्र, यंदा आपणही ठाणे शहरात इच्छुक असून आपल्यालाही संधी हवी, असे
उघड वातावरण करण्यात यशस्वी झाले आहेत.

सेनेचे नरेश म्हस्केही मैदानात

दुसरीकडे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के पूर्ण तयारीत उतरले असून सेनेतला माहोल म्हस्केंना तिकीट मिळाल्यात जमा असाच आहे. शिवाय, सेना-भाजपा युती झाली, तरीही ठाणे हे आम्हालाच हवे. हवे.. म्हणजे हवेच, अशी सेनेची भूमिका ठरली आहे. त्यामुळे केळकरांच्या कोंडीचा ट्रॅफिक जॅम सहा महिने अगोदरच सुरू झाल्याचे चित्र ठाण्यात पाहायला मिळत आहे.

Web Title:  Power show in Kelkar constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.