ठाणे, दि. 13 - डोंबिवलीजवळील कोपर येथील बैठ्या चाळीत साडेसहा लाख रुपये हप्त्याने रूम विकत देतो, अशी बतावणी करून एक लाख ८२ हजारांची फसवणूक करणा-या तुषार आणि महेश खेडेकर या दोन भावांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
ओमसाई कन्स्ट्रक्शन्सचे मालक असलेल्या या खेडेकर बंधूंनी आपसात संगनमत करून नवी मुंबई येथील रहिवासी किरण शिंदे (३२) यांना कोपर पूर्व येथे बैठ्या चाळीत हप्त्याने साडेसहा लाखांमध्ये रूम विकत देतो, अशी बतावणी केली. त्यापोटी त्यांच्याकडून एक लाख ७० हजार रुपये तसेच बचतीचे १२ हजार अशी एकूण एक लाख ८२ हजारांची रक्कम १० नोव्हेंबर २०१४ ते १२ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत घेतली. शिंदे यांच्याप्रमाणेच आणखी ३८ रुमच्या गुंतवणूकदार आणि बचत योजनेचे इतर सभासद यांच्याकडूनही त्यांनी अशाच प्रकारच्या रकमा उकळल्या आहेत. त्यांनाही पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली असल्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शिंदे यांच्याव्यतिरिक्त इतरांकडून किती पैसे घेण्यात आले आहेत, याबाबतचा तपास सुरू असल्यामुळे यात नेमके किती लोकांचे किती पैसे घेतले, याचीची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती ठाणेनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस.बी. ताबड यांनी दिली.