एमडी अंमली पदार्थाची उत्तर प्रदेशातील फॅक्टरी ठाणे पोलिसांनी केली उद्धवस्त

By जितेंद्र कालेकर | Published: March 18, 2024 07:45 PM2024-03-18T19:45:11+5:302024-03-18T19:45:24+5:30

गुन्हे शाखेची कारवाई: अडीच कोटींच्या एमडीसह २७ कोटी ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

MD Narcotics factory in Uttar Pradesh raided by Thane Police | एमडी अंमली पदार्थाची उत्तर प्रदेशातील फॅक्टरी ठाणे पोलिसांनी केली उद्धवस्त

एमडी अंमली पदार्थाची उत्तर प्रदेशातील फॅक्टरी ठाणे पोलिसांनी केली उद्धवस्त

ठाणे : उत्तर प्रदेशातील एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने पदार्फाश केला आहे. या प्रकरणी युपीतील वाराणसी जिल्ह्यातून अतुल सिंह (३६) आणि संतोष गुप्ता (३८) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून अडीच कोटींची २५ किलाे ग्रॅम एमडी पावडर, ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे रसायन आणि इतर साहित्य असे २७ कोटी ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनी सोमवारी दिली.

ठाण्यातील कासारवडवली भागात युनिट एकच्या पथकाने २४ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आफताफ अजीज मलाडा (२२, नालासोपारा,जिल्हा पालघर), जयनाथ यादव उर्फ कांचा (२७, नालासोपारा), शेरबहाद्दूर उर्फ अंकित (२३, नालासोपारा) आणि हुसेन सैय्यद (४८, नालासोपारा) या चौघांना अटक केली हाेती. त्यांच्या ताब्यातून १४ लाखांचे ४८१ ग्रॅम एमडी जप्त केले होते. सखाेल तपासात या टोळक्याने यूपीतून ड्रग्ज आणल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील आणि सहायक पोलिस निरीक्षक रुपाली पोळ, उपनिरीक्षक आनंदा भिलारे, हवालदार विजय यादव आदींचे एक पथक उत्तरप्रदेशात गेले. भगवतीपूर या छोट्याशा गावात तब्बल दीड महिना वेषांतर करून ड्रग्ज फॅक्टरीचा या पथकाने शोध घेतला. फॅक्टरीची माहिती मिळताच १६ मार्च २०२४ रोजी यूपीच्या स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने या ड्रग्ज फॅक्टरीवर या पथकाने छापा टाकला. यावेळी अतुल सिंह आणि संतोष गुप्ता या दोघांना एमडी ड्रग्जची निर्मिती करतांना रंगेहाथ पकडले. शेतातील एका घरातच थाटलेल्या ड्रग्ज फॅक्टरीतून एमडी बनविण्यासाठी लागणारे रसायन, इतर साहित्य, एक कार आणि दोन कोटी ६४ लाखांचे तयार एमडी असा २७ कोटी ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात ठाणे पोलिसांना यश आले.
 
आतापर्यंत या प्रकरणात सहा आरोपींना अटक केली. साेनू गुप्ता याच्याकडून माहिती मिळाल्यानंतर यातील आणखी दाेघांना अटक केली. न्यायालयामार्फत ट्रान्सिट कोठडी मिळाल्यानंतर त्यांना थेट विमानाने ठाण्यात आणण्यात आले. परराज्यात ठाणे पोलिसांनी पहिल्यांदाच ड्रग्ज निर्मितीच्या फॅक्टरीचा पर्दाफाश करुन आरोपींना सिनेस्टाईल पकडल्याने तपास पथकाचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी कौतुक केले आहे.

Web Title: MD Narcotics factory in Uttar Pradesh raided by Thane Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे