वाचन प्रेरणा दिनानिमित्त व्यास क्रिएशन्स्चा वाचन जागर सप्ताह, भरगच्च कार्यक्रमांचे आयेाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 17:31 IST2018-10-13T16:44:27+5:302018-10-13T17:31:41+5:30
वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचू आनंदे मेळावामध्ये पुस्तक प्रदर्शन आयोजित केले आहे. यात प्रेरक पुस्तकांच्या संचाचे वाचकार्पण देखील होत आहे.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त व्यास क्रिएशन्स्चा वाचन जागर सप्ताह, भरगच्च कार्यक्रमांचे आयेाजन
ठाणे : माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन अर्थात वाचनप्रेरणा दिन याचे औचित्य साधून व्यास क्रिएशन्स् प्रकाशन संस्थेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांना वाचनप्रवृत्त करणे आणि पुस्तकांशी मैत्री करून देणे यासाठी वाचन जागर सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. शनिवारी या मेळाव्याचा पहिला दिवस पार पडला.
सरस्वती मंदिर ट्रस्ट आणि व्यास क्रिएशन्स् यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारपर्यंत ऑक्टोबर दरम्यान वाचू आनंदे मेळावा साजरा होत आहे. मुलांनी मुलांसाठी भरवलेले पुस्तक प्रदर्शन ही या मेळाव्याची मध्यवर्ती थीम आहे. एकूण बारा विभागात पुस्तकांची विभागणी करण्यात येणार आहे. पुस्तकांचे स्टॉल, मांडणी, पोस्टर, प्रदर्शनातील पुस्तकांचे महत्त्व समजावून सांगणे आणि शिक्षकांच्या व व्यास किएशन्स्च्या सहकार्यांच्या मदतीने पुस्तक व्रिक्री हे सारे विद्यार्थीच करत आहेत. सरस्वती मंदिर, नौपाडा, ठाणे येथील प्रांगणात सकाळी 8 ते 5.30 पर्यंत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना लाभ घेता येत आहे. पुस्तकविश्वात मुलांनी रममाण होऊन पुस्तके हेच आपले सोबती हा संदेश यानिमित्ताने देता येत आहे.
या विविध उपक्रमांच्या माध्यमातून पुस्तकांचा अनोखा आणि नावीन्यपूर्ण जागर होत आहे. वाचन प्रेरणा दिन सप्ताहानिमित्त रविवार१४क्टोबर रोजी थिएटर कोलाज आणि व्यास क्रिएशन्स् यांच्या संयुक्त विद्यमाने एका आगळावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कथाकथन, गोष्टींचे सादरीकरण, पुस्तकांचे अभिवाचन बालकुमार गटातील विद्यार्थी अभिनव पद्धतीने करणार आहेत. यावेळी व्यास क्रिएशन्स् प्रकाशित तीन प्रेरणादायी पुस्तकांचे वाचकार्पण होणार आहे. पुण्याच्या टाइनी टेल्स या संस्थेचे सहकारी खास बालदोस्तांसाठी गोष्टींचा धमाल आणि अनोखा प्रयोग सादर करणार आहेत. ठाण्यात अशा स्वरूपाचा पहिलाच कार्यक्रम आहे. आर्यक्रिडा मंडळ, गांवदेवी मैदानाजवळ सायंकाळी ५ ते ७ यावेळेत ही धमाल भेट बालदोस्तांना मिळणार आहे. ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पितांबरी उद्योग समूह हे मुख्य प्रायोजक आहेत.वाचन प्रेरणा दिनानिमित्त व्यास क्रिएशन्स्चा खास कुमारांसाठी प्रेरक पुस्तकांचा संच प्रकाशित होत आहे. तीन उत्तुंग व्यक्तिमत्त्वे छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र सोप्या, रंजक भाषेत घेऊन येत आहेत.