उल्हासनगरात स्मशानभूमीत माजी नगरसेवकाचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:00 IST2017-10-09T00:00:47+5:302017-10-09T00:00:54+5:30
महापालिकेने खरेदी केलेल्या कचऱ्याच्या डब्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक दिलीप मालवणकर हे चक्क स्मशानभूमीत उपोषणाला बसणार आहेत.

उल्हासनगरात स्मशानभूमीत माजी नगरसेवकाचे उपोषण
उल्हासनगर : महापालिकेने खरेदी केलेल्या कचऱ्याच्या डब्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक दिलीप मालवणकर हे चक्क स्मशानभूमीत उपोषणाला बसणार आहेत. पालिका आयुक्तांनी डब्बे खरेदीचे निविदा रद्द केली नाहीतर, न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला.
उल्हासनगर महापालिकेने शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी, तसेच ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी 6 कोटीच्या निधीतून कचऱ्याचे 3 लाख 44 हजार डब्बे खरेदी करण्यासाठी निविदा काढली. मात्र पालिकेत एकूण 1 लाख 72 हजार मालमत्ताधारक असून त्यापैकी 25 ते 30 टक्के मालमत्तेचा थांगपत्ता नाही. तसेच 40 हजार मालमत्ता वाणिज्य वापराच्या आहेत. मग 1 लाख 72 मालमत्ता गृहीत धरून कचऱ्याचे दोन डब्बे देणार का?,असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच एक डब्याची 175 तर दोन डब्याची किंमत 350 रुपये दाखविली आहे. त्याच डब्याची किंमत बाजारात 70 ते 90 रुपये असल्याचे बिल मालवणकर यांनी सोशल मीडियावर टाकले .
एकूणच कचऱ्याचे डब्बे खरेदीत मोठा घोळ असल्याचा आरोप करून निविदा रद्द करण्याची मागणी केली. त्या 6 कोटीच्या निधीतून भूखंड विकत घेउन कायमस्वरूपी प्रकल्प उभारण्याचा सल्ला दिला. महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर काहीएक निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ मालवणकर यांनी उपोषनाचा इशारा दिला होता. त्यांनी अचानक कॅम्प नं 4 येथील स्मशानभूमीत सोमवारी उपोषण करणार असल्याचे, रात्री उशिरा जाहीर केले. या प्रकाराने सर्वांना धक्का बसला असून मनसे, पीआरपी यांच्यासह विविध सामाजिक संस्थेने उपोषणाला पाठिंबा दिला आहे.