डोंबिवली: बिल्वदलचे रहिवासी न्यायाच्या प्रतिक्षेत, पालकमंत्र्यांनी दिली केवळ आश्वासने

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 06:22 PM2018-04-11T18:22:40+5:302018-04-11T18:22:40+5:30

मानपाडा रोडवरील बिल्वदल ही इमारत ८ ऑगस्ट २०१४ रोजी अचानक खचल्याने त्या इमारतीमधील ४८ कुटुंबीयांना रातोरात जागा सोडण्यास सांगितले होते.

Dombivali: residents of Bildhal await justice | डोंबिवली: बिल्वदलचे रहिवासी न्यायाच्या प्रतिक्षेत, पालकमंत्र्यांनी दिली केवळ आश्वासने

डोंबिवली: बिल्वदलचे रहिवासी न्यायाच्या प्रतिक्षेत, पालकमंत्र्यांनी दिली केवळ आश्वासने

Next

डोंबिवली: येथिल मानपाडा रोडवरील बिल्वदल ही इमारत ८ ऑगस्ट २०१४ रोजी अचानक खचल्याने त्या इमारतीमधील ४८ कुटुंबीयांना रातोरात जागा सोडण्यास सांगितले होते. तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनामुळे रहिवाश्यांनी इमारत तातडीने रिकामी केली. पण त्यास आज ३ वर्षे ८ महिने झाले, पुढे इमारतीच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने कसलीही हालचाल झालेली नाही. दोन दिवसांपूर्वी सुनिलनगरमधील ओमशिव गणेश या इमारतीला तडे गेल्याने त्यांनीही इमारत रीकामी केली, पण त्यांना आयुक्त गोविंद बोडके हे तातडीने प्लॅन मंजूर करुन देणार आहेत तर मग आमच्यावर अन्याय का असा सवाल रहिवाश्यांनी केला.
येथिल रहिवासी शिवसेनेचे कार्यकर्ते संजय मांजरेकर म्हणाले की, यासंदर्भात अनेकदा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले असून मुख्यमंत्र्यांना १२० वेळा पत्रव्यवहार केला, पण हाती मात्र काहीही आले नाही. स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांनाही पत्र दिले, पण स्थिती जैसे थे. १९८३ मध्ये ही इमारत बांधण्यात आली होती. त्यामुळे इमारत जुनी झाली असून रिकामी करावी लागणार असे सोनवणे यांनी आदेश दिले, ते आम्ही तातडीने पाळले होते, पण ते एकल्यामुळेच रस्त्यावर येण्याची वेळ आली का असा सवाल मांजरेकर यांनी केला. पालकंत्र्यांना ९ जानेवारी रोजी देखिल भेटलो, पण बघू करु अशीच आश्वासने मिळाली, पुढे हालचाल मात्र काहीही झाली नाही. खासदात श्रीकांत शिंदेंनीही १७ जानेवारी रोजी आमची मंत्रालयात बैठक लावली होती. त्यावेळीही पालकमंत्री, महापौर, महापालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी, नगरसेवक सगळे उपस्थित होते, पण ती केवळ बैठकच ठरल्याचे ते म्हणाले.
आतापर्यंत सहा आयुक्त आले, पण आमची ओंजळ रिकामीच राहीली. आता नवे आयुक्त बोडके हे वेगवान कार्यशील अधिकारी असल्याचे जाणवत आहे. ज्या प्रमाणे त्यांनी मंगळवारी डोंबिवलीत येत ‘त्या’ रहिवाश्यांना दिलासा दिला, तसाच न्याय आम्हालाही द्यावा अशी रहीवाश्यांच्या वतीने मागणी करत असल्याचे मांजरेकर म्हणाले. आयुक्त दर महिन्याच्या तिस-या सोमवारी डोंबिवलीत येणार असल्याचे कळले होते, ते जेव्हा डोंबिवलीत येतील तेव्हा त्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे ते म्हणाले. त्या रहिवाश्यांना न्याय मिळायलाच पाहिजे, पण आम्हालाही आमच्या जागा मिळाव्यात ही अपेक्षा असून आश्वासनांच्या हिंदोळयावर किती दिवस जगायचे असा सवाल मांजरेकर यांनी केला.

Web Title: Dombivali: residents of Bildhal await justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.