डम्पिंग ग्राउंडविरोधात अंबरनाथमध्ये रहिवाशांची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 02:54 AM2018-12-03T02:54:25+5:302018-12-03T02:54:35+5:30

अंबरनाथ नगरपालिके चे बेकायदा डम्पिंग ग्राउंड तत्काळ बंद करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे.

Demonstration of residents of Ambernath against dumping ground | डम्पिंग ग्राउंडविरोधात अंबरनाथमध्ये रहिवाशांची निदर्शने

डम्पिंग ग्राउंडविरोधात अंबरनाथमध्ये रहिवाशांची निदर्शने

Next

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिके चे बेकायदा डम्पिंग ग्राउंड तत्काळ बंद करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, मागणीचा विचार होत नसल्याने रहिवाशांनी संघर्ष समिती स्थापन करून डम्पिंगविरोधात निदर्शने सुरू केली आहे. रविवारी सुटीचा दिवस साधत शेकडो नागरिकांनी डम्पिंगविरोधात निदर्शने केली. यापुढे या डम्पिंगवर एकही गाडी येऊ देऊ नये, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
अंबरनाथ फॉरेस्टनाका येथे पालिकेचे डम्पिंग ग्राउंड असून २५ वर्षांपासून याच ठिकाणी शहरातील कचरा डम्प केला जात आहे. मात्र, वर्षभरापासून या डम्पिंगवर लागणारी आग नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. सतत हा प्रकार घडत असल्याने दुर्गंधी आणि डम्पिंगच्या धुराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या डम्पिंगविरोधात ग्रीन सिटी, हरिओम पार्क आणि मोरिवली पार्क भागातील रहिवासी एकवटले असून त्यांनी डम्पिंगविरोधात संघर्ष समिती तयार केली आहे. या समितीच्या माध्यमातून आंदोलने केली जात आहे.
या आंदोलनाचा एक भाग म्हणून रविवारी सर्व नागरिकांनी एकत्रित येत डम्पिंग ग्राउंडला आणि त्या ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या कचºयाला कडाडून विरोध केला. डम्पिंगवर कचरा टाकू देणार नाही, अशी ठाम भूमिका या संघर्ष समितीमार्फत घेण्यात आली. संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात शेकडो रहिवासी सहभागी झाले होते. राजकीय पक्षांची मदत न घेता नागरिकांनी एकत्रित येऊन या डम्पिंग ग्राउंडवर निदर्शने केली. डम्पिंगविरोधात घोषणा देत हातात फलक घेऊन नागरिकांनी प्रशासनाचा निषेध केला.
मुळात ज्या सोसायट्यांना या डम्पिंगचा त्रास होत आहे त्या सोसायटीने आपला लढा सुरू करताना हे डम्पिंग ग्राउंड अनधिकृत असल्याचे कारण पुढे केले आहे. डम्पिंगचे आरक्षण ज्या जागेवर आहे, त्याच ठिकाणी कचरा हलवण्यात यावा, अशी मागणी केली आहे. पालिकेमार्फत सुरू असलेले डम्पिंग बेकायदा असल्याने पालिकेने या ठिकाणी कचरा टाकू नये, अशी भूमिका निदर्शनकर्त्यांनी घेतली आहे. मोरिवलीपाड्यातूनच हे आंदोलनकर्ते डम्पिंगपर्यंत पोहोचले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
>ग्राउंड अजूनही पेटलेले
डम्पिंगवरील त्रासाची जाणीव पालिकेला झाल्यावर पालिकेने त्या ठिकाणी मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, त्रास अजूनही कमी झालेला नाही. निदर्शने सुरू असतानाही डम्पिंग पेटलेले होते. त्यामुळे पालिकेकडून योग्य कार्यवाही होत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

Web Title: Demonstration of residents of Ambernath against dumping ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.