नगरसेवकांचे ते टॅब धूळखात; ५४ लाखांचा खर्चही वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:05 IST2018-11-02T00:05:06+5:302018-11-02T00:05:16+5:30
गेल्या टर्ममध्ये आणि अवघे चार ते पाच महिनेच नगरसेवकांच्या हाती टॅब दिसले होते. नंतर नवीन बॉडी आल्यानंतर ते पालिकेच्या दप्तरी धूळखात पडले आहेत.

नगरसेवकांचे ते टॅब धूळखात; ५४ लाखांचा खर्चही वाया
ठाणे : स्मार्ट सिटीबरोबर नगरसेवकांनाही स्मार्ट बनवण्यासाठी पालिका प्रशासनाने त्यांच्या हाती टॅब दिले होते. परंतु, गेल्या टर्ममध्ये आणि अवघे चार ते पाच महिनेच नगरसेवकांच्या हाती टॅब दिसले होते. नंतर नवीन बॉडी आल्यानंतर ते पालिकेच्या दप्तरी धूळखात पडले आहेत. त्यातील अनेक टॅब बंदही असून त्यावर केलेला ५४ लाखांचा खर्चही वाया गेला आहे. शिवाय, पेपरलेस महासभा करण्याच्या पालिकेच्या धोरणाचेही बारा वाजले आहेत.
त्या टॅबचा वापर आजही होऊ न शकल्याने त्यांचे करायचे काय, असा प्रश्न पालिकेला सतावू लागला आहे. २०१५ च्या मध्यंतरी ठाणे महापालिकेने महासभा आणि स्थायी समितीवर कागदांच्या माध्यमातून होणारा खर्च टाळण्यासाठी टॅबची संकल्पना पुढे आणली होती. त्यानुसार, १३५ नगरसेवकांसाठी टॅब वितरित करण्यात आले. त्यातील १२ नगरसेवकांनी ते नाकारले आहेत. ते कसे हाताळायचे, याचे प्रशिक्षणही नगरसेवकांना दिले. सुरुवातीला नवीन म्हणून काही नगरसेविका महासभेला टॅब आणत होत्या. त्यानंतर, २०१६ मध्ये महासभेतच उशिरा गोषवारे मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर महासभेपासून टॅबवर गोषवारे उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. ते नगरसेवकांना टॅबवर पाठवलेसुद्धा होते. परंतु, अनेकांना त्याचा वापरच करता न आल्याने पालिकेला नाइलाजास्तव पुन्हा हातातच गोषवारे द्यावे लागले. २०१७ मध्ये ठामपाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सर्व नगरसेवकांकडील टॅब पालिकेने जमा करून घेतले.
पालिकेचा प्रयोग अपयशी
दोन वर्षे उलटूनही नगरसेवकांच्या हाती पुन्हा टॅब आलेले नाहीत. सध्या ते पालिकेत धूळखात पडून असून यातील अनेक टॅब बंद झाले असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. एकूणच नगरसेवकांना स्मार्ट करण्याचा पालिकेचा प्रयोग सपशेल अपयशी ठरला आहे.