भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची पूर्ण भिस्त राहणार राष्ट्रवादीवरच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 02:55 AM2019-03-20T02:55:53+5:302019-03-20T02:56:43+5:30

भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असणार, हे अद्याप गुलदस्त्यात असले, तरी एकूणच चित्र पाहता काँग्रेसची भिस्त बहुतांशी राष्ट्रवादीवरच अवलंबून असणार आहे.

Congress depend on NCP in Bhiwandi Lok Sabha constituency | भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची पूर्ण भिस्त राहणार राष्ट्रवादीवरच

भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची पूर्ण भिस्त राहणार राष्ट्रवादीवरच

Next

- श्याम राऊत

मुरबाड - भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक २९ एप्रिल रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी युती आणि आघाडी दोहोंनी कंबर कसली आहे. युतीच्या वाटणीत भिवंडीची जागा भाजपाच्या वाट्याला, तर आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. या मतदारसंघाचे विद्यमान खासदार कपील पाटील हे भाजपाचे असून, यावेळीही त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा उमेदवार कोण असणार, हे अद्याप गुलदस्त्यात असले, तरी एकूणच चित्र पाहता काँग्रेसची भिस्त बहुतांशी राष्ट्रवादीवरच अवलंबून असणार आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात २00९ साली काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे हे निवडून आले होते. २0१४ मध्ये टावरे यांना डावलून भाजपातून आलेले कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी दिली गेली. विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने कुणबी कार्ड खेळले. कारण या मतदारसंघात मुरबाड, शहापूर, भिवंडीचा ग्रामीण भाग आणि कल्याणच्या ग्रामीण भागात कुणबी समाज मोठा आहे. शिवाय शहापूर, मुरबाडमध्ये राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे.

भिवंडी शहरातील मुस्लिम मतदार कोणत्याही परिस्थितीत भाजपाला मतदान करणार नाही, असा अंदाज बांधून विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी दिली गेली. यावर उपाय म्हणून भाजपाने कपील पाटील यांना राष्ट्रवादीतून आयात करून उमेदवारी दिली. त्यामुळे कुणबी विरु द्ध आगरी लढत होऊन विश्वनाथ पाटील जिंकतील, असा सर्वांचाच अंदाज होता; मात्र प्रत्यक्षात उलटेच झाले. मुरबाड तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे व माजी आमदार गोटीरामभाऊ पवार हे विश्वनाथ पाटील यांच्यासोबत असतानाही, ज्या गावात राष्ट्रवादीशिवाय कुणालाच मतदान होत नव्हते, तेथेदेखील कपील पाटील यांना आघाडी मिळाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत असलेल्या जवळीकीमुळे कपील पाटील यांना मुरबाड विधानसभा मतदारसंघात पन्नास हजार मतांची आघाडी मिळाली. हिच आघाडी कपील पाटील यांचा विजय तर विश्वनाथ पाटील यांचा पराभव करून गेली; मात्र त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेली चूक सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीला मारक ठरून माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांना पराभव पत्करावा लागला. आता तशी परिस्थिती राहीली नाही. कपील पाटील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मदत केली; मात्र पाटील यांच्याकडून त्यांना सहकार्य तर मिळालेच नाही, उलट मुरबाड तालुक्यात राष्ट्रवादी संपवण्यासाठी प्रयत्न केले. यावेळच्या निवडणुकीत त्याचे पडसाद कसे उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काँग्रेसच्या उमेदवारीसाठी माजी खासदार सुरेश टावरे आणि २0१४ च्या निवडणुकीत पराभूत झालेले विश्वनाथ पाटील हे देव पाण्यात बुडवून बसले आहेत; मात्र काँग्रेसची उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी एका बाहेरच्या उमेदवाराचे जिकरीचे प्रयत्न सुरू आहेत.
उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय दिल्लीच्या दरबारात होणार आहे. काँग्रेसची उमेदवारी कुणालाही मिळाली, तरी त्या उमेदवाराची भिस्त राष्ट्रवादीवरच आवलंबून असणार आहे; कारण भिवंडी शहर वगळता उर्वरित मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्व नाममात्र आहे.

Web Title: Congress depend on NCP in Bhiwandi Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.