नगरसेविका काळे यांना अटक करा, पोलीस उपायुक्त कार्यालयावर काढला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 03:59 AM2017-10-25T03:59:44+5:302017-10-25T03:59:46+5:30
कल्याण : आमदार निधीतून झालेल्या विकासकामांच्या श्रेयाच्या बॅनरवरून १६ आॅक्टोबरला शिवसेना नगरसेवक माधुरी काळे आणि शीतल मंढारी यांच्यात हाणामारी झाली होती.
कल्याण : आमदार निधीतून झालेल्या विकासकामांच्या श्रेयाच्या बॅनरवरून १६ आॅक्टोबरला शिवसेना नगरसेवक माधुरी काळे आणि शीतल मंढारी यांच्यात हाणामारी झाली होती. याप्रकरणी मंढारी यांच्या तक्रारीच्या आधारे काळे यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्हा दाखल होऊनही काळे यांना कोळसेवाडी पोलीस अटक करीत नसल्याने आदिवासी विकास परिषदेने पोलीस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढला.
कल्याण पूर्वेतील विजयनगर पोलिस चौकीपासून आदिवासी विकास परिषदेने काढलेल्या मोर्चात नगरसेविका मंढारी, प्रकाश पंडित, भारत सोनवणे, सुमित हुमणे, संजय केदारे आदी कार्यकर्ते सहभागी झालेले होते. पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांची परिषदेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी काळे यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आठ दिवस उलटून गेले तरी काळे यांना अटक करण्यात आलेली नाही. गुन्हा दाखल झाल्यावर २४ तासांत आरोपीला अटक होणे आवश्यक आहे. तशी कायद्यात तरतूद आहे. तरीही पोलीस काळे यांना अटक करण्यासाठी चालढकल करत असल्याचा आरोप केला आहे. शिंदे म्हणाले, की काळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुरावे गोळा करून त्यांच्या अटकेचा निर्णय घेतला जाईल. दरम्यान, चार दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन उपायुक्तांनी दिले असल्याची माहिती हुमणे यांनी दिली.
नगरसेविका काळे यांनी सांगितले की, नगरसेविका मंढारी यांच्या तक्रारीच्या आधारे खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याठिकाणी मी कोणत्याही प्रकारे जातीवाचक शब्द वापरलेला नाही. त्यामुळे खोटी तक्रार देणाºया मंढारी यांचीच चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
>केवळ बदनामीसाठी गुन्हा
भारतीय मराठी सेवा प्रतिष्ठानचे प्रदेश कार्याध्यक्ष अरविंद मोरे यांनी सहायक पोलीस आयुक्तांची भेट घेतली. काळे या मराठा समाजाच्या आहेत. ९७ टक्के बोगस केस मराठा समाजाविरोधात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंढारी यांच्या तक्रारीद्वारे काळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मराठा समाजाच्या नगरसेविकेला बदनाम करण्यासाठी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी मोरे यांनी केली आहे.