लग्नाच्या अमिषाने भिवंडीतून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीवर नेपाळमध्ये लैंगिक अत्याचार
By जितेंद्र कालेकर | Updated: February 20, 2018 22:05 IST2018-02-20T21:29:45+5:302018-02-20T22:05:10+5:30
भिवंडीतून साडे तीन वर्षांपूर्वी अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीवर नेपाळमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार करण्यात आले. तिच्याशी जबरदस्तीने विवाह करणारा अशोक यादव आणि त्याच्या भावाला ठाणे पोलिसांनी भिवंडीतून अटक केली आहे.

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
जितेंद्र कालेकर
ठाणे : लग्नाचे अमिष दाखवून एका १२ वर्षीय मुलीचे भिवंडीतील कामतघर भागातून तीन वर्षांपूर्वी अपहरण करण्यात आले होते. जबरदस्तीने विवाह करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या अशोक यादव (२८) आणि त्याला यात मदत करणारा त्याचा मोठा भाऊ विरेंद्र (३०) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने रविवारी भिवंडीतून अटक करून पिडीतेची त्यांच्या ताब्यातून सुटका केली आहे.
कामतघर भागातून एका १२ वर्षीय मुलीचे तिच्याच घरासमोर राहणा-या अशोक आणि विरेंद्र या दोन भावांनी तीन वर्षांपूर्वी अपहरण केले होते. याबाबतचा गुन्हा भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात १५ जून २०१४ रोजी तिच्या आईने दाखल केला होता. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षामार्फत तपास करण्यात येत होता. या मुलीचे अपहरण करणा-या अशोक आणि विरेंद्र या दोन्ही भावांची माहिती पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील यांना त्यांच्या एका खब-याने दिली. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याणी पाटील, जमादार राजू महाले, हवालदार डी. जे. हवाळ आणि पोलीस नाईक निशा कारंडे आदींच्या पथकाने भिवंडीतील कामतघर परिसरातील फेणागाव झोपडपट्टीतून अपहरण झालेल्या (सध्या १५ वय) पिडीत मुलीचा १७ फेब्रुवारी २०१८ रोजी शोध घेतला. तिच्याकडे केलेल्या चौकशीत तीन वर्षांपूर्वी विरेंद्र आणि अशोकने अपहरण करून तिला नेपाळ आणि भारताच्या सीमेवर असलेल्या कपिलवास्तू जिल्ह्यातील पटपर गावात नेऊन अशोकने तिच्याशी जबरदस्तीने हिंदू विवाह पद्धतीने विवाह केला. नंतर तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केले. यातून तिने दोन मुलींना जन्म दिला. त्यातील एक तीन वर्षांची तर दुसरी दोन महिन्यांची आहे. अपहरणाच्या काळात तिला नेपाळ भागातच ठेवण्यात आले होते. तीन वर्षांचा काळ लोटला असून आता आपल्यावर कसलीच कारवाई होणार नाही, या अविर्भावात असलेल्या यादव बंधूंनी तिला तिच्या मुलीसह पुन्हा भिवंडीत (जिल्हा ठाणे) आणले. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिची सुटका केली असून दोघांविरुद्ध अपहरण, लैंगिक अत्याचार, पोक्सो आणि बाल विवाह प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करून त्यांना १८ फेब्रुवारी २०१८ रोजी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.