अंबरनाथमधील प्रेशिया कंपनीला भीषण आग; तीन कामगार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 06:18 PM2018-11-05T18:18:48+5:302018-11-05T18:18:57+5:30

अंबरनाथ मोरीवली गावातील औद्योगिक वसाहतीमधील प्रशिया केमिकल कंपनीला दुपारी 2 वाजता आग लागली.

Ambernath Company fires; Three workers injured | अंबरनाथमधील प्रेशिया कंपनीला भीषण आग; तीन कामगार जखमी

अंबरनाथमधील प्रेशिया कंपनीला भीषण आग; तीन कामगार जखमी

Next

अंबरनाथ : अंबरनाथ मोरीवली गावातील औद्योगिक वसाहतीमधील प्रशिया केमिकल कंपनीला दुपारी 2 वाजता आग लागली. या आगीमुळे कंपनीतील केमिकलच्या ट्रमचा मोठा स्फोट होऊन त्यात संपूर्ण केमिकल कंपनी जळून खाक झाली. या आगीत चार कामगार जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मोरीवली एमआयडीसीमधील या प्रेशिया कंपनीत रसायणांवर प्रक्रिया केली जाते. या कंपनीतील घातक केमिकल हे सुरक्षित न ठेवल्याने त्या केमिकलने पेट घेतला. त्यामुळे या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. दुपारी 2 वाजता हा प्रकार घडल्यावर कंपनीत 13 कामगार काम करीत होते. मात्र कंपनीतील केमिकलने पेट घेतल्याचे लक्षात येताच सर्व कामगारांनी पळ काढला. त्या दरम्यान कंपनीत काम करणारे मंगलेश भारती, सरस्वती प्रसाद मिश्र, सरोजकुमार पांडा, रमेश चांदलकर हे कंपनीतून बाहेर पडत असताना आगीच्या विळख्यात सापडले. त्यात हे चौघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, कंपनी ही रेल्वे रुळाला लागून असल्याने आगीच्या ज्वाळा या रेल्वे रुळापर्यंत येत असल्याने तब्बल अर्धा तास रेल्वे सेवा थांबविण्यात आली होती. त्यानंतर संथ गतीने या मार्गावरून रेल्वे सेवा सुरू झाली. तर दुसरीकडे ही आग विझविण्यासाठी अंबरनाथ पालिका, बदलापूर पालिका, उल्हासनगर महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिकांसोबत अंबरनाथ एमआयडीसी कंपनीचे अग्निशमनच्या गाड्या आल्या होत्या. सुरुवातीला ही आग पसरणार नाही याची दक्षता घेण्यात आली.

आजूबाजूच्या कंपनीला आग लागणार नाही, यासाठी पाणी मारण्यात येत होते. तसेच ही आग रेल्वे रूळाच्या बाजूलाही पसरणार नाही, याची दक्षता घेण्यात येत होती. ही आग पाहण्यासाठी शेकडोच्या संख्येने बघ्यांची गर्दी झाली होती. या गर्दीतून मार्ग काढत अग्निशमन दलाला आगीच्या ठिकाणी पोहचावे लागले.  आग विझवली जात असताना कंपनीत ठेवलेले अनेक घातक रसायनांच्या ट्रमचे स्फोट मोठ मोठ्याने होत होते. त्यामुळे आग विझविण्यासाठी अडचणी निर्माण होत होते. सायंकाळी 5 वाजेपर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती. 

Web Title: Ambernath Company fires; Three workers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.