निवृत्तीनंतर पोलिसांनी वेळ आणि पैशाचे योग्य नियोजन करावे- डॉ.शिवाजी राठोड

By जितेंद्र कालेकर | Published: December 31, 2018 10:35 PM2018-12-31T22:35:36+5:302018-12-31T22:40:17+5:30

ठाणे ग्रामीण पोलीस दलातून जमादार नथुराम हाटे, जगन्नाथ माने आणि पोलीस हवालदार अशोक आमरे हे तिघे ३१ डिसेंबर २०१८ रोजी पोलीस सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीनिमित्त ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी या तिघांचाही सोमवारी सपत्नीक सत्कार केला.

 After the retirement, police should plan appropriate time and money - Dr. Shivaji Rathod | निवृत्तीनंतर पोलिसांनी वेळ आणि पैशाचे योग्य नियोजन करावे- डॉ.शिवाजी राठोड

सेवानिवृत्त पोलिसांचा सत्कार

googlenewsNext
ठळक मुद्देठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी दिला सल्लासेवानिवृत्त पोलिसांचा सत्कारनिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता

ठाणे: पोलीस कर्मचारी, अधिकारी यांनी निवृत्तीनंतर मिळणा-या पैशांचे तसेच उपलब्ध होणा-या वेळेचे योग्य नियोजन करायला हवे, असा वडिलकीचा सल्ला ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी सोमवारी निवृत्त पोलीस कर्मचा-यांना दिला. सेवानिवृत्तीनंतरही कोणतीही अडचण आल्यास त्यांनी पोलीस यंत्रणेशी कधीही संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जमादार नथुराम हाटे (मीरारोड पोलीस ठाणे, ३२ वर्ष पोलीस सेवा), जमादार जगन्नाथ माने (सुरक्षा शाखा, ठाणे ग्रामीण, ३७ वर्ष सेवा) आणि पोलीस हवालदार अशोक आमरे (मीरारोड , ३७ वर्ष सेवा) हे तिघे ३१ डिसेंबर २०१८ रोजी पोलीस सेवेतून निवृत्त झाले. यानिमित्त ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांच्या सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी कर्मचा-यांना मार्गदर्शन करताना डॉ. राठोड यांनी हा सल्ला दिला. ते पुढे म्हणाले, निवृत्तीनंतर पुढे आपल्याला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून घ्या. कुटूंबियांना आणि नातलगांना वेळ द्या. आरोग्याची काळजी घ्या. निवृत्तीनंतरच्या पैशाचे नियोजन करतांना स्वत:साठीही गुंतवणूक करा. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. समाजात आणि कुटुंबातही आपला ‘पोलिसी’ खाक्या दाखवू नका. आपला ताणतणाव घराबाहेरच ठेवा. मुलांना आणि कुटुंबियांना योग्य ठिकाणी सल्ला द्या. पण त्यांच्या वैयक्तिक जीवनात जास्त ढवळाढवळही करु नका. ज्यामुळे तुमची कोणाला अडचणही वाटणार नाही. आवडेल तिथे प्रवास करा, जीवनाचा आनंद घ्या, असे अनेक सल्ले देत सन्मानाने निवृत्तीचे जीवन जगा, असेही ते म्हणाले. यावेळी हाटे यांनीही मनोगत व्यक्त करीत पोलीस खात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. खाकी वर्दीच्या रुबाबामुळे एका आयएएस अधिका-याला कशी मदत केली, याचा अनुभव त्यांनी कथन केला. डॉ. आर. टी. राठोड यांच्या कार्यकाळात पोलीस भरती तर डॉ. शिवाजी राठोड यांच्या हस्ते होणारा निवृत्तीचा समारंभ हा एक दुर्मिळ योगायोग असल्याचे ते म्हणाले. अनेक वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडून कुटूंब प्रमुखाप्रमाणे शिकायला मिळाले. समाजाचीही सेवा करता आली, हे सांगताना पोलीस खात्यातील अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. यावेळी या तिन्ही कर्मचा-यांचा डॉ. राठोड यांच्याहस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला. त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि त्यांच्या सौभाग्यवतींसाठी साडी देऊन त्यांना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी केले.

Web Title:  After the retirement, police should plan appropriate time and money - Dr. Shivaji Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.