लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील तरुणीवर पाच वर्षे लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 15:12 IST2017-12-06T15:12:11+5:302017-12-06T15:12:25+5:30
ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून ठाण्याच्या लोकमान्यनगर येथील एका २५ वर्षीय तरुणीला तिच्याच एका नातेवाईक असलेल्या दीपक विश्वकर्मा (२८) याने गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील तरुणीवर पाच वर्षे लैंगिक अत्याचार
ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून ठाण्याच्या लोकमान्यनगर येथील एका २५ वर्षीय तरुणीला तिच्याच एका नातेवाईक असलेल्या दीपक विश्वकर्मा (२८) याने गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
पीडित तरुणी आणि विश्वकर्मा हे दोघेही नातेवाईक असल्यामुळे त्यांची एकमेकांशी चांगली ओळख आहे. याच ओळखीतून तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. ती मूळची उत्तर प्रदेशची आहे. तोही मूळचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील आहे. याच कारणामुळे त्यांची अधिक जवळीक आली. याचा त्याने गैरफायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखवित तिच्यावर २०१२ पासून नवी मुंबईतील दिघा येथील ईश्वरनगर तसेच दिवा येथील त्याच्या घरी तसेच लोकमान्यनगर येथील तिच्या घरी आणि मुलुंड येथील एका लॉजवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार २०१२ ते ६ जुलै २०१७ पासून सुरू होता. लग्नाचे नाव काढल्यानंतर तो वेगवेगळी कारणे सांगून लवकरच लग्न करणार असल्याचे तिला सांगायचा. पुढे शरीर संबंध ठेवण्यासाठी तो धमकावत होता. कुठे वाच्यता केल्यास बदनामी करण्याचीही तिला तो धमकी देत होता. तरीही तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्यानंतर मात्र तो ठाणे जिल्ह्यातून पसार झाला.
अखेर आपली मानसिक आणि शारीरिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने ५ डिसेंबर रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दीपकविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. आरोपी ठाण्यातून पसार झाला असून त्याला शोधण्यात येत असल्याचे वर्तकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत यादव यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक एस. आर. अडसुळे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.