खंडणीखोर पोलिसाला बेड्या, व्यापाऱ्याचे अपहरण करून 10 लाखांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 13:03 IST2018-07-11T13:01:56+5:302018-07-11T13:03:43+5:30
नंदूरबारच्या व्यावसायिकाला ब्लॅकमेल करीत त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर या व्यापाऱ्याकडून दोन लाखांची खंडणी उकळून आणखी दहा लाखांची मागणी एका पोलिसाने केली.

खंडणीखोर पोलिसाला बेड्या, व्यापाऱ्याचे अपहरण करून 10 लाखांची मागणी
ठाणे - एका महिलेला हाताशी धरुन नंदूरबारच्या व्यावसायिकाला ब्लॅकमेल करीत त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर या व्यापाऱ्याकडून दोन लाखांची खंडणी उकळून आणखी दहा लाखांची मागणी करणारा वर्तकनगर पोलीस ठाण्याचा पोलीस कॉन्स्टेबल दिपक वैरागड (33, रा. वर्तकनगर पोलीस वसाहत, ठाणो) आणि त्याचा साथीदार सोहेल पंजाबी (23, रा. राबोडी, ठाणो) या दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. याप्रकरणात त्यांनी ओलीस ठेवलेल्या व्यापाऱ्याच्या मुलाचीही त्यांच्या तावडीतून सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
नंदूरबारमधील या अपहरण, खंडणी आणि ब्लॅकमेलिंगच्या काळ्या व्यवहारात ठाणे शहर पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील एक पोलीस शिपाई अडकल्याने संपूर्ण ठाणो पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नंदूरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा येथील रिजवान मेमन याला खंडणीसाठी अपहरण केल्याची तक्रार त्याच्या पित्याने ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे केली. त्यानंतर काशीमीरा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला हे प्रकरण ठाणे ग्रामीणच्या कार्यक्षेत्रातील काशीमीरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. मात्र, या गुन्ह्याची सुरुवात ठाणे शहर पोलिसांच्या वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील येऊरच्या एका खोलीतून झाली. त्यामुळे हे प्रकरण आता वर्तकनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.