डिजेआयच्या फँटम ४ प्रो ड्रोनची नवीन आवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 10:54 PM2018-05-17T22:54:33+5:302018-05-17T22:54:33+5:30

डिजेआय कंपनीने आपल्या फँटम ४ प्रो या अतिशय लोकप्रिय ठरलेल्या ड्रोनची नवीन आवृत्ती जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

A new version of the Dioni Phantom 4 Pro Drone | डिजेआयच्या फँटम ४ प्रो ड्रोनची नवीन आवृत्ती

डिजेआयच्या फँटम ४ प्रो ड्रोनची नवीन आवृत्ती

googlenewsNext

मुंबई - डिजेआय कंपनीने आपल्या फँटम ४ प्रो या अतिशय लोकप्रिय ठरलेल्या ड्रोनची नवीन आवृत्ती जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. डिजेआयने फँटम ४ प्रो व्ही२.० या नावाने नवीन ड्रोन सादर केले आहे. याची मूळ आवृत्ती २०१६ साली लाँच करण्यात आली असून याला जगभरात अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्‍वभूमिवर, याच्या अद्ययावत आवृत्तीमध्ये मूळ मॉडेलपेक्षा काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे नॉईस रिडक्शन होय. खरं तर, कोणत्याही ड्रोनचा आवाज हा अतिशय कर्कश्य असतो. यावर मात करण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न करण्यात आले तरी यात यश आले नाही. या पार्श्‍वभूमिवर, डिजेआय कंपनीने आपल्या नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने मूळ मॉडेलपेक्षा तब्बल ६० टक्के कमी आवाज करणार्‍या ड्रोनला विकसित केले असून तेच डिजेआय फँटम ४ प्रोच्या नवीन आवृत्तीच्या माध्यमातून सादर करण्यात आले आहे. अर्थात हे ड्रोन अतिशय कमी आवाज करणारे असेल. यात आधीपेक्षा सुमारे ४ डेसिबल्स इतका कमी ध्वनी निर्मित होणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. हाच याचा सेलींग पॉइंटही ठरू शकतो. तसेच यात ऑक्यु-सिंक एचडी ट्रान्समीशन सिस्टीमदेखील प्रदान करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून डिजेआयच्या हेडसेटमध्ये थेट प्रक्षेपणाची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. तर या ड्रोनचे नियंत्रण स्मार्टफोन अथवा डिजेआयने प्रदान केलेल्या रिमोट कंट्रोलच्या मदतीने करता येते.

कमी ध्वनीच्या फिचरचा अपवाद वगळता फँटम ४ प्रो व्ही२.० या मॉडेलमधील अन्य फिचर्स हे मूळ मॉडेलप्रमाणेच असतील. याचे वजन १३७५ ग्रॅम असून यात असणारी ६,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी सुमारे ३० मिनिटांचा बॅकअप देत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यामध्ये १ इंच सीएमओएस सेन्सर असून याच्या कॅमेर्‍याची क्षमता २० मेगापिक्सल्स इतकी आहे. यातील कॅमेर्‍याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण शक्य आहे. यात मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्ट असून याच्या मदतीने १२८ जीबीपर्यंतच्या स्टोअरेजची व्यवस्था करण्यात आली आहे. या ड्रोनचा अधिकतम वेग ७२ किलोमीटर प्रति-तास इतका असून याची रेंज सुमारे ७ किलोमीटरची असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील या मॉडेलचे मूल्य १,४९९ डॉलर्स आहे.

 

Web Title: A new version of the Dioni Phantom 4 Pro Drone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.