अमित शाहांच्या ताफ्याची गाईला धडक, बीजेडी खासदारानं उडवली खिल्ली
By admin | Published: July 7, 2017 01:49 PM2017-07-07T13:49:28+5:302017-07-07T13:49:28+5:30
गाईवरुन बीजू जनता दलाला (बीजेडी) भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षांवर निशाणा साधण्याची आयती संधीच मिळाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - भाजपानं गो संरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. देशात गो संरक्षणाच्या नावाखाली कथित गो-रक्षकांकडून लोकांना मारहाण करणे, हत्या करणे यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर गाईवरुन बीजू जनता दलाला (बीजेडी) भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षांवर निशाणा साधण्याची आयती संधीच मिळाली आहे. गुरुवारी ओडिशामध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या ताफ्यातील कारची एका गाईला धडक बसली. या घटनेत गाय जखमी झाली आहे.
यावरुन बीजेडीचे नेते आणि खासदार तथागत सत्पथी यांनी शाह यांना टार्गेट करत म्हटले आहे की, ""अमित शाह यांच्या ताफ्यानं गाईला धडक दिली. ती वाईट पद्धतीनं जखमी झाली आहे. होली काउ"". अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी भाजपा अध्यक्षांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे.
Amit Shah"s carcade hits a cow at Barchana, Orissa. Animal badly hurt. Holy Cow!
— Office of T Satpathy (@SatpathyLive) July 6, 2017
-TS
एका पोलीस अधिका-यानं दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (12 जुलै ) जजपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 5 वर बंडालो परिसरात ही घटना घडली. या परिसरातील पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक निरंजन सबर यांनी सांगितले की, अमित शाह यांच्या ताफ्यातील एक वाहनाची गाईला धडक बसली. ही गाय रस्ता ओलांडत असताना हा प्रकार घडला. या गाईदेखील जखमी झाली असून गाडीचंही किरकोळ नुकसान झाले आहे. अमित शाह ज्या कारमध्ये होते ती कार ती घटनास्थळावरुन आधीच पुढील मार्गाकडे रवाना झाली होती.
भारतीय जनता पार्टीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ताफ्यात भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार प्रताप सारंगीदेखील होती. ताफ्यातील वाहनानं गाईला धडक दिल्यानंतर काही कार्यकर्त्यांसमवेत ते घटनास्थळी काही काळ थांबले होते. यावेळी जखमी गाईच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली. सारंगी यांनी तातडीनं जजपूरच्या जिल्हाधिका-यांसोबत संपर्क साधत जखमी गाईच्या उपचारांची व्यवस्था करण्यास सांगितले.
सध्या गाईची प्रकृती ठिक असल्याची माहिती मिळत आहे. गो संरक्षणाचा मुद्दा उचलून धरणा-या भाजपावर मात्र या घटनेनंतर विरोधकांकडून मिश्लिक टीका केली जात आहे.
आणखी बातम्या वाचा
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतरही त्याचा काहीही परिणाम न झाल्याचेच पाहायला मिळत आहे. गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेऊ पाहणा-यांना इशारा दिल्यानंतरही देशात अशा प्रकारच्या घटना कमी होण्याचं नाव घेत नाहीत. आसाममधील सोनपूरमधील काही लोकांनी ट्रकमधून गाय घेऊन जाणा-या एका व्यक्तीला रस्त्यात रोखलं, इतकंच नाही तर त्याला बेदम मारहाणही केली.
वृत्तसंस्था "एएनआय" दिलेल्या माहितीनुसार, काही जणांनी रस्त्याच्या मधोमध गाय घेऊन जाणारा ट्रक थांबवला व चालकाला मारहाण केली. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये दिसत आहे की, रस्त्याशेजारील एका ट्रकमागे काही जण उभे आहेत तर काही जण आत चढून ट्रकची तपासणी करत आहे. तर दुसरीकडे रस्त्यावरच एका व्यक्तीला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली जात आहे. या प्रकरणी आता आसाम पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, 29 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मदी यांनी गुजरातमधील साबरमती येथे बोलताना गोरक्षणाच्या नावाखाली होणा-या हिंसेवर तीव्र आक्षेप नोंदवला होता. यावेळी गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा गोरक्षकांना देतानाच महात्मा गांधी व विनोबा भावे यांनी गोरक्षणाचा जो मार्ग दाखवला, त्याच मार्गाने आपण पुढे जायला हवे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.
साबरमती आश्रमाच्या शताब्दी महोत्सवात बोलताना मोदी म्हणाले होते की, आपण अहिंसेची शिकवण मिळालेल्या देशात आहोत. गांधीजींच्या देशात आपण राहतो. त्यांनी आपला अहिंसेचा मार्ग कसा यशस्वी ठरतो, हे दाखवून दिले आहे. त्यांनी आणि विनोबा भावे यांनी आपल्याला गोरक्षणाचा जो मार्ग दाखवला, तोच आपण आत्मसात करायला हवा. पंतप्रधान मोदी यांनी गोरक्षकांकडून होणाऱ्या हिंसाचाराबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, असे सांगत हिंसाचाराच्या घटनांबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली होती.