बार्शी : तालुक्यातील हिंगणी पा  येथील शेतकरी आनंद काशीद येथील यांच्या शेतातील ऑक्टोबर छाटणी नंतर द्राक्ष बागेतील काड्यांना औषध लावल्यानंतर सात मजुरांना विषबाधा झाल्याची घटना घडली. यातील चार मजूर बेशुद्ध असल्याने यातील एकास पुढील उपचारासाठी  सोलापूर येथे  पाठवावे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी की, हिंगणी पा येथील शेतकरी आनंद काशीद यांची १९ एकर द्राक्षबाग आहे. ऑक्टोबर छाटणी नंतर द्राक्ष काडी फुटण्यासाठी हायड्रोजन सायनामाईत हे औषध शेतकरी छाटलेल्या काड्या ना लावतात. काशीद यांनी वैराग येथील औषध विक्रेते सोनार महाराज यांच्याकडून  कॅनब्रेक कंपनीचे औषध खरेदी केले होते. हे औषध रंगात मिसळून कापडाच्या साह्याने हाताने द्राक्ष काड्याना लावण्यात येत होते. काशीद यांच्या शेतात शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत औषध लावण्याचे काम चिखर्डे येथील ११ तरुण शेतकरी कारी येथील ठेकेदार संभाजी घावटे यांच्या मार्फत करत होते. दिवसभर औषध लावताना शेतकऱ्यांचे अंगावर हे औषध उतरल्याने त्वचेतून विषबाधा झाली. काम संपल्या नंतर रात्री उशिरा या कामगारांना त्रास जाणवु लागल्याने बार्शीतील डॉ जगदाळे मामा हॉस्पिटल  व कोंढारे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

कामगारांना विषबाधा झाल्याचे कळताच माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी हॉस्पिटलला भेट देऊन शेतकऱ्यांची चौकशी केली.  हॉस्पिटल मध्ये प्रभारी तालुका कृषी अधिकारी संजय गायकवाड, पंचायत समिती कृषी अधिकारी अण्णासाहेब साठे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक अधिकारी अनिल कांबळे यांनी भेट देऊन विचारपूस करून माहिती जाणून घेतली.

ही घटना औषधांचा जास्ती ढोस घेतल्यामुळे झाल्याचे बोलले जात आहे. ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्याच्या मागणी वरून ढोस वाढवून वापरण्यात आला होता. तर औषध फवारणीसाठी ठेकेदाराला काम देण्यात आले होते. ठेकेदाराने नवखी मूल या कामासाठी आणल्यामुळे व त्यांनी औषध लावत असताना योग्य ती काळजी न घेतल्याने ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे.  नेमकी ही घटना कोणाच्या चुकीमुळे घडली याचा तपास कृषी अधिकारी करीत आहेत.
 

या मजुरांना झाली विषबाधा....
आनंद नानासाहेब माने (वय २२), तानाजी मोहन देठे (वय २३), किरण मधुकर म्हसेकर (वय : २३), दत्तात्रय तुळशीदास चव्हाण (वय २७), अक्षय हनुमंत सवणे (वय १८), सागर जनार्धन सुतार (वय २१), बाबू बापू ढवारे (वय ४०).


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.