रहमानसाहेब प्रवचनातून विणतात सर्वधर्माचे धागे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 08:22 PM2018-09-10T20:22:19+5:302018-09-10T20:23:31+5:30

दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद या गावचे रहमानसाहेब शेकूसाहेब सेतसंदी हे नाव सर्वांच्या परिचयाचे झाले आहे.

Rahmansaheb News | रहमानसाहेब प्रवचनातून विणतात सर्वधर्माचे धागे

रहमानसाहेब प्रवचनातून विणतात सर्वधर्माचे धागे

Next

 सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद या गावचे रहमानसाहेब शेकूसाहेब सेतसंदी हे नाव सर्वांच्या परिचयाचे झाले आहे.  लगतच्या कर्नाटक सिमेवरील जिल्ह्यांसह लातूर, उस्मानाबाद, तुळजापूर, पंढरपूरपर्यंत त्यांच्या अनोख्या कार्याची महती पोहचली आहे. स्वत:च्या मुस्लिम धर्माचे पालन करण्यासोबतच हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास असलेले आणि भागवताच्या माध्यमातून ज्ञानामृत पेरणारे रहमानसाहेब आपल्या कृतीतून आणि वाणीतून जातीधर्माच्या विटा तोडत सर्वधर्मसमभावाचे धागे विणत आहेत.

सोलापुरच्या गुरूवारपेठेतील शंकरलिंग देवालयात श्रावण समाप्तीनिमीत्त सोमवारी त्यांचे प्रवचन झाले. या निमीत्ताने त्यांच्याशी संवाद घडला. औराद येथील यशवंत विद्यालयातून प्रयोगशाळा सहाय्यक पदावरून निवृत्त झालेले ६६ वर्षांचे रहमानसाहेब गावोगावाहून येणाा-या निमंत्रणावरून प्रवचने देत फिरत असतात. बालपणी सोलापुरातील शिक्षणानंतर धर्मशास्त्र अभ्यासातील चिकित्सकवृत्ती वाढली. गावातील गंगाधर शहापुरे यांनी धार्मिक शिक्षण दिले. सुरूवातीला एक मुस्लिम मुलगा हिंदू धर्मग्रंथांचे अध्ययन करतो म्हटल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले. पुढे गावच्या मंदिरातील रोजच्या प्रवचनाची जबाबदारी शहापुरे यांनी रहमानसाहेबांवर सोपविली. १९७३ पासून ते या कार्यात आहेत. पंचीकरण, विचार चंद्रोदय, विचार सागर, वृत्ती प्रभाकर हे त्यांचे आध्यात्मातील आवडीचे विषय! यासोबच रामायण, महाभारत, गीता, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ, शिवपाठ, दशउपनिषद, प्रस्थान गै यासह अनेक धार्मिक ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला आहे. मराठी, हिंदी, कन्नड या भाषेतून त्यांची रसाळ वाणी प्रवाहित होत असते. संतांच्या बोधवचनांतून समाजमने जागविण्याचे त्यांचे कार्य अव्यहत सुरू आहे. 
 
रहमानसाहेब स्वत:च्या धर्माचरणानुसार मस्जिदमध्ये नमाज पढतात. कुराणावर प्रवचन करतात. रोजाही ठेवतात. या बरोबरच  मंदिरात जावून प्रवचने देतात. ग्रंथांचे पारायण करतात. लातूर, तुळजापूर, उस्मानाबादमध्ये तीन महिन्यातून सत्संग घेतात. आजवर एक हजार प्रवचनांचे कार्यक्रम त्यांनी केले आहेत. नेहमी शाकाहाराचे पालन करून पाचही एकादशी आणि उपवासही ते करतात. त्यांच्या या कार्यात कधीच धर्म आडवा आला नाही.

Web Title: Rahmansaheb News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.