पांडुरंगासाठी पंढरीला पायी निघालेल्या वृद्ध वारकऱ्यावर कुत्र्याचा हल्ला
By विलास जळकोटकर | Published: June 27, 2023 03:37 PM2023-06-27T15:37:24+5:302023-06-27T15:40:07+5:30
कुंभारीजवळ मध्यरात्री घडली घटना
सोलापूर : ‘भेटी लागे जीवा लागलिचि आस’ या निस्सीम भावनेनं पंढरीला पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी चालत निघालेल्या वृद्ध वारकऱ्यावर कुत्र्यानं हल्ला चढवल्यानं त्यांना जखमी व्हावं लागलं. सोमवारच्या मध्यरात्री बाराच्या नंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावाजवळ ही घटना घडली.
यातील वारकरी नीलकंठ ईश्वर ठाकरे (वय- ७५) वृद्ध आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी खांद्यावर भगवी पताका घेऊन पायी चालत निघाले होते. दिवसा रस्ता उरकत नसल्याने रात्रीच्यावेळी ते चालत निघाले होते. कुंभारी गावाजवळ अनोळखी व्यक्त पाहून कुत्र्यानं त्यांच्यावर हल्ला चढवला. यात ते जखमी झाले. त्यांना डॉ. दिनेश सगन यांनी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असून, उपचार सुरु आहेत. त्यांचा राहण्याचा पत्ता अद्याप मिळालेला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची चोंद झाली आहे.