‘बेडमेट’ मिळेल? -तरुणीच्या पोस्टनं खळबळ; ‘हॉट बेडिंग’ही होतेय प्रचलित! 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 08:41 AM2023-12-04T08:41:01+5:302023-12-04T08:41:27+5:30

आन्याच्या या जाहिरातीवर अनेकांनी टीका केली आहे. त्यामुळे फेसबुकवर टाकलेली पोस्ट तिनं काढून टाकली आहे

Get a 'bedmate'? - Excited by the young woman's post; 'Hot bedding' is becoming popular! | ‘बेडमेट’ मिळेल? -तरुणीच्या पोस्टनं खळबळ; ‘हॉट बेडिंग’ही होतेय प्रचलित! 

‘बेडमेट’ मिळेल? -तरुणीच्या पोस्टनं खळबळ; ‘हॉट बेडिंग’ही होतेय प्रचलित! 

जगभरात कुठेही जा, प्रत्येक गोष्टीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. घर आणि जमीन याबाबतीत तर त्यांचे दर कायमच आकाशाला भिडलेले असतात. त्यामुळेच आपलं स्वत:चं घर असावं असं जगात बहुतेकांना वाटत असतं. पण, त्याच वेळी त्यातल्या अनेकांना ते अशक्यप्रायही असतं! त्यामुळेच दुधाची तहान ताकावर भागवताना अनेकांना अनेक गोष्टी भाड्यानं किंवा ‘शेअरिंग’ तत्त्वावर घ्याव्या लागतात. पण, भाडेतत्त्वावर राहणं तरी कुठे स्वस्त आहे? जे विद्यार्थी शिक्षणासाठी म्हणून बाहेरगावी गेलेले असतात, जातात त्यांना या भाड्याच्या घरांचं दु:ख माहीत असतं. त्यासाठी त्यांना किती यातायात करावी लागते तेही तेच जाणोत. 

एकतर नव्या शहरात आपल्याला हवं तिथं, आपल्याला पाहिजे तसं घर मिळत नाही, मिळालं तर त्याचं भाडं परवडत नाही. त्यासाठी मग विद्यार्थी ‘शेअरिंग’ तत्त्वावर आणखी काही विद्यार्थी / विद्यार्थिनी मिळतात का याचा तपास करतात. त्यांचा तो शोधही कायम सुरूच असतो. कारण अशी मुलं / मुली मिळाली तरी त्यातलं कोणीतरी अचानक किंवा काही ना काही कारणानं सोडून जातं. रूममधील एक जरी व्यक्ती कमी झाली तरी प्रत्येकाला पुन्हा टेन्शन येतं. कारण भाड्याचा त्यांच्यावरचा आर्थिक बोजा वाढतो. कॅनडातल्या एका तरुणीलाही काही दिवसांपासून हाच प्रश्न सतावतो आहे. पण, तिचा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे. तिचं म्हणणं आहे,  ज्या टोरांटो शहरात ती राहाते, तिथलं केवळ हाउसिंग मार्केटच नाही, तर प्रत्येकच गोष्ट महाग होत चालली आहे. हातात येणारा पैसा तुटपुंजा आणि पैसा खिशातून बाहेर जाण्यासाठी तर असंख्य वाटा! तिला मिळणाऱ्या पैशात सगळं काही भागवणं तिला केवळ अशक्य होत आहे. त्यामुळे तिनं एक नवीच शक्कल लढवली आहे. या तरुणीचं नाव आहे आन्या एटिंगर. तिनं जे काही केलं, त्यामुळे सोशल मीडियावर ती तुफान गाजते आहे. 

आन्यानं आधी फेसबुकवर जाहिरात पोस्ट केली आणि त्यानंतर सोशल मीडियावर आपला एक व्हिडीओही शेअर केला. त्यात तिनं म्हटलंय, “मी टोरांटोमध्ये राहते आणि माझ्यासाठी मी एका ‘बेडमेट’च्या शोधात आहे. माझ्याकडे क्विन साईज बेड आहे, जो माझ्या एकटीसाठी खूपच मोठा आहे. या बेडचा दुसरा कोपरा मला भाड्यानं द्यायचा आहे. यासाठी मला ‘बेडमेट’ची गरज आहे.” आन्याच्या या जाहिरातीनं संपूर्ण जगभरात, सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. कोणी आपला (अर्धा) बेड असा भाड्यानं देतं का, असा प्रश्न नेटकरी विचारताहेत. काही जणांनी मात्र तिला पाठिंबाही दर्शवला आहे.

अर्थातच या ‘बेडमेट’साठी तिच्या काही अटीही आहेत. त्यातली पहिली अट आहे, बेडच्या केवळ एका कोपऱ्यासाठी या भाडेकऱ्याला महिन्याला नऊशे कॅनडियन डॉलर (सुमारे ६५० अमेरिकन डॉलर, साधारण ५५ हजार रुपये) मोजावे लागतील. दुसरी महत्त्वाची अट आहे, आन्याला बेडमेट म्हणून महिलाच हवी आहे. कोणत्याही पुरुषासाठी ही ऑफर नाही. याशिवाय जी कोणी तिच्यासोबत बेड शेअर करेल, तिला कमीतकमी एक वर्ष तरी तिथं राहावं म्हणजेच झोपावं लागेल. या बेडचं भाडं ती व्यक्ती भरू शकेल की नाही, तेवढी तिची ऐपत आहे की नाही, याचा पुरावा म्हणून त्या व्यक्तीला आपली पे स्लिप, आयडी प्रूफ आणि रेंट डिपॉजिट आधी भरावं लागेल. 

आन्याच्या या जाहिरातीवर अनेकांनी टीका केली आहे. त्यामुळे फेसबुकवर टाकलेली पोस्ट तिनं काढून टाकली आहे; पण, तिच्या व्हीडिओला मात्र तुफान प्रतिसाद मिळतो आहे. युजर्सचं म्हणणं आहे, बेड शेअर करण्याची ही कुठली पद्धत? शिवाय बेडचा केवळ एक कोपरा शेअर करण्यासाठी ती जे भाडं मागते आहे, तेही काही चांगलं डील नाही! आन्याचं मात्र म्हणणं आहे, बेड शेअरिंगची जाहिरात केल्यामुळे लोकांनी माझ्यावर टीका केली असली, तरी टोरांटोमधील वाढती महागाई पाहता माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही. याआधीही मी माझा बेड शेअरिंग करत भाड्यानं दिलेला आहे!

‘हॉट बेडिंग’ही होतेय प्रचलित! 
आन्यानं दिलेल्या बेड शेअरिंगच्या जाहिरातीमुळे नेटिझन्समध्ये खळबळ उडाली असली तरी या पद्धतीचे प्रकार आता जगभरात सुरू झाले आहेत. त्यातला एक प्रकार आहे ‘हॉट बेडिंग’! विशेषत: शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेले विद्यार्थी आणि तरुण हा पर्याय चाचपून पाहत आहेत. रूमचं भाडं देणं परवडत नसल्यानं ते फक्त झोपण्यासाठी म्हणून बेड भाड्यानं घेतात. अनोळखी व्यक्तींनाही हा बेड झोपण्यासाठी भाड्यानं दिला जातो. अनेकदा हा बेड शिफ्टमध्येही भाड्यानं दिला जातो!

Web Title: Get a 'bedmate'? - Excited by the young woman's post; 'Hot bedding' is becoming popular!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.