सिंधुदुर्ग : कोकण पदवीधरसाठी शिवसेनेची व्यूहरचना; कुडाळ येथे कार्यकर्ता मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 13:43 IST2018-06-11T13:43:45+5:302018-06-11T13:43:45+5:30
२०१९ च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात शिवसेनेची एकहाती सत्ता आणणे आपले स्वप्न असून, त्यासाठी विधानसभेबरोबरच विधान परिषदेतही आपली सत्ता असावी, यासाठी वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे शिवसेनेचा पहिला आमदार या पदवीधर मतदारसंघातून निवडून द्या, असे आवाहन शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. ते कुडाळ येथे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते.

कुडाळातील शिवसेनेच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक केसरकर, विनायक राऊत, वैभव नाईक, अरूण दुधवडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
कुडाळ : २०१९ च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात शिवसेनेची एकहाती सत्ता आणणे आपले स्वप्न असून, त्यासाठी विधानसभेबरोबरच विधान परिषदेतही आपली सत्ता असावी, यासाठी वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे शिवसेनेचा पहिला आमदार या पदवीधर मतदारसंघातून निवडून द्या, असे आवाहन शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. ते कुडाळ येथे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते.
कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात शिवसेनेचा हा मेळावा ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, शिवसेना नेते सूरज चव्हाण, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख किशोरी पेडणेकर, सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, संजय पडते, अमरसेन सावंत, युवा सेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, विक्रांत सावंत, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई विद्यापीठातील सिनेटमधील एकहाती विजय हा शिवसैनिकांचा विजय आहे. महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणण्याचे स्वप्न असून, हे स्वप्न २०१९ ला पूर्ण करण्याची जबाबदारी शिवसैनिकांची आहे. शिवसैनिक हा भगव्यासाठी व बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्ततेसाठी लढत आहे. हीच लढत आता या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपासून दाखवू. मोरे यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. कोकणात शिक्षणाचे प्रश्न मोठ्या प्रमाणात असून येथील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी २५ जूनच्या विजयानंतर पुन्हा सिंधुदुर्गात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वैभव नाईक म्हणाले, शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच या मतदारसंघातील निवडणूक युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढविली जात असून, आपला उमेदवार निवडून आणून आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व सिध्द करण्याची जबाबदारी सर्व शिवसैनिकांची आहे, असे सांगत शिवसेना संपविणार, असे सांगणाऱ्यांना येथील शिवसैनिकांनी घरी बसविण्याचे काम केले आहे. ते आता फक्त दुसऱ्यांना पाठिंबा देण्याचे काम करीत असल्याचा टोला विरोधकांना लगावला.
विनायक राऊत म्हणाले, प्रथमच शिवसेना ही निवडणूक लढवित असून, शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी केला आहे. या जिल्ह्यातील पदवीधरांच्या साडेसहा हजारांपैकी ८५ टक्के मतदान शिवसेनेचे उमेदवार मोरे यांनाच होण्याचा विश्वास व्यक्त करीत पक्षप्रमुख ठाकरे यांना दिलेला शब्द पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले. लवकरच जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणणार असून, यासाठी पालकमंत्री केसरकर यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
एकवेळ संधी द्या : दीपक केसरकर
यावेळी केसरकर म्हणाले, पदवीधरांनी या मतदारसंघात चांगल्या प्रकारे नोंदणी केली असल्याने मोरे यांचा विजय निश्चित आहे. कुडाळ तालुक्यात मुंंबई विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर आहे. सागरी संशोधन केंद्रही होणे गरजेचे असून, त्याचा पाठपुरावा सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दहावी, बारावी परीक्षेत राज्यात आघाडीवर आहे. मात्र, शिक्षणाच्या सुविधांपासून हा जिल्हा वंचित असून येथील शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेला या निवडणुकीच्या माध्यमातून एकवेळ संधी द्यावी, असे आवाहन केले.