टंचाई निवारणासाठी अधिकारी, ग्रामसेवकांत समन्वय आवश्यक- नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 03:23 PM2017-12-03T15:23:34+5:302017-12-03T15:26:52+5:30

वैभववाडी : आपण टोलवाटोलवी करतो किंवा अपुरी माहिती देतो; तेव्हा जनतेचा आपल्यावरचा विश्वास कमी होऊ लागतो. त्यामुळे अधिकारी आणि ग्रामसेवकांनी आपसात समन्वय ठेवून ग्रामस्थांना विश्वासात घ्या.

Nitesh Rane needs to coordinate with the Gram Sevaks for reducing the scarcity | टंचाई निवारणासाठी अधिकारी, ग्रामसेवकांत समन्वय आवश्यक- नितेश राणे

टंचाई निवारणासाठी अधिकारी, ग्रामसेवकांत समन्वय आवश्यक- नितेश राणे

Next

वैभववाडी : आपण टोलवाटोलवी करतो किंवा अपुरी माहिती देतो; तेव्हा जनतेचा आपल्यावरचा विश्वास कमी होऊ लागतो. त्यामुळे अधिकारी आणि ग्रामसेवकांनी आपसात समन्वय ठेवून ग्रामस्थांना विश्वासात घ्या. तरच तालुक्यातील पाण्याचा प्रश्न चांगल्या पद्धतीने सुटू शकतो. यावर्षीचा टंचाई आराखडा बनविताना आधीची मंजूर कामे पूर्ण करून घेणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे, असे मत आमदार नितेश राणे यांनी पाणीटंचाई आराखडा नियोजन सभेत व्यक्त केले.

येथील पंचायत समितीच्या सभागृहात पाणीटंचाई आराखड्याची सभा झाली. यावेळी तहसीलदार संतोष जाधव, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती लक्ष्मण रावराणे, उपसभापती हर्षदा हरयाण, प्रभारी गटविकास अधिकारी डॉ. वैभव सापळे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, पल्लवी झिमाळ, पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर पाटील उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला आमदार राणे यांनी गेल्या वर्षीच्या टंचाई आराखड्यातील मंजूर कामांच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यामध्ये बरीच कामे न झाल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत माहिती घेत असताना अधिकारी आणि ग्रामसेवकांच्या माहितीत विसंगती आढळली. त्यामुळे अधिकारी आणि ग्रामसेवकांमध्ये समन्वय नसल्यामुळेच पाण्याचा प्रश्न प्रलंबित राहत असल्याचे  उपस्थितांच्या निदर्शनास आणून देत चुकीची माहिती देऊन लोकप्रतिनिधींची दिशाभूल करता हा आमचा अपमान नाही का? असे खडे बोल राणे यांनी अधिका-यांना सुनावले. तांत्रिक अडचणीमुळे गेल्या वर्षीच्या आराखड्यातील न झालेली टंचाईची कामे यावर्षीच्या आराखड्यात प्राधान्याने घेण्याची सूचना करताना अडचणींवर उपायही सुचवा. नुसती कारणे सांगत बसू नका, असेही आमदार राणे यांनी प्रशासनाला सुनावले. पाणीटंचाईच्या कामात कुचराई करणा-या एकावर तरी निलंबनाची कारवाई करा. त्याशिवाय सगळे सरळ होणार नाहीत, अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली.

गेल्या वर्षीच्या टंचाई आराखड्यात मंजूर असलेली परंतु अद्याप सुरू न झालेली कामे येत्या आठ दिवसांत सुरू करून डिसेंबर अखेर पूर्ण करण्याची ग्वाही देताना टंचाई आराखडा सभेला मोजकेच सरपंच उपस्थित राहिल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत पुढच्या सभेला सरपंच व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार राणे यांनी केले.

नव्या राष्ट्रपतींचाही सन्मान करा !
सभागृहात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि माजी राष्ट्रपतींची प्रतिमा दिसते. परंतु नव्या राष्ट्रपतींची निवड होऊन बरेच दिवस झाले. तरी त्यांची प्रतिमा सभागृहात दिसत नाही. पंचायत समितीत सत्ताबदल होताच ज्या तत्परतेने नारायण राणेंच्या प्रतिमा काढल्या ती तत्परता नव्या राष्ट्रपतींच्या बाबतीत येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे दिसत नाही. नव्या राष्ट्रपतींचीही प्रतिमा तात्काळ सभागृहात लावून त्यांचाही सन्मान करा, असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला. पाणीटंचाई आराखडा नियोजनाची सभा आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात झाली. यावेळी तहसीलदार संतोष जाधव, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती लक्ष्मण रावराणे, गटविकास अधिकारी डॉ. वैभव सापळे आदी उपस्थित होते.

Web Title: Nitesh Rane needs to coordinate with the Gram Sevaks for reducing the scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.