ऐतिहासिक काझी शहाबुद्दीन इमारत आगीत खाक, अज्ञाताने आग लावल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 08:03 PM2018-01-29T20:03:06+5:302018-01-29T20:04:07+5:30

सावंतवाडीतील ऐतिहासिक अशा काझी शहाबुद्दीन हॉल या इमारतीला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत ही ऐतिहासिक इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे.

Historical Kazi Shahabuddin building fire, suspected of setting fire to unknown | ऐतिहासिक काझी शहाबुद्दीन इमारत आगीत खाक, अज्ञाताने आग लावल्याचा संशय

ऐतिहासिक काझी शहाबुद्दीन इमारत आगीत खाक, अज्ञाताने आग लावल्याचा संशय

Next

सावंतवाडी : सावंतवाडीतील ऐतिहासिक अशा काझी शहाबुद्दीन हॉल या इमारतीला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत ही ऐतिहासिक इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. सुदैवाने इमारतीत कोण नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे. आग विझविण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. मात्र अधूनमधून आग धुमसतच होती. दरम्यान, पालिकेने आग लावल्याचा संशय व्यक्त केला असून, या विरोधात ते पोलिसांत तक्रार देणार आहेत.

सावंतवाडी शहरात ऐतिहासिक काझी शहाबुद्दीन हॉल हा हेरिटेज वास्तूत गणला जातो. ही इमारत मुख्य एसटी बस स्थानकांच्यासमोर आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ही इमारत जीर्ण झाल्याने पालिकेने इमारत बंद करून ठेवली होती. तसेच तिचा वावरही बंद केला होता. मात्र तिची डागडुजी करण्यात आली नव्हती. इमारतीच्या एका बाजूला अंध बाधवांचे कार्यालय होते. तेही इतरत्र हलविण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण इमारत बंद अवस्थेतच होती. दरम्यान, सोमवारी दुपारच्या सुमारास या इमारतीच्या आतील भागातून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला म्हणून समोरच्या प्रांताधिकारी कार्यालयात कामानिमित्त आलेले सदाशिव परब यांना दिसली.

त्यामुळे त्यांनी तत्काळ पालिकेला माहिती दिली. पालिकेचे अग्निशामक बंबासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ही इमारत सबनीसवाडा भागात येत असल्याने त्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह काही नगरसेवकही घटनास्थळी आले आणि त्यांनी जोरदार प्रयत्न करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण काझी शहाबुद्दीन हॉलची इमारतही पूर्णपणे जीर्ण झाली असल्याने आतील लाकूड सामानही जुनाट आहे. त्यामुळे आगीने जोरात पेट घेतला. त्यातच पालिकेचे अग्निशामक बंबही नादुरुस्त असल्याने ते दुरूस्तीसाठी देण्यात आले आहेत. ते अद्यापपर्यंत मिळाले नसल्याने एका मोठ्या टाकीला मोटर लावून आगीवर पाणी मारण्यात येत होते. या पाण्याने आग नियंत्रणात येत नव्हती. त्यामुळे एक खासगी पाण्याची टाकीही मागविण्यात आली होती. आग विझविण्याचे कर्मचाºयांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. पण सायंकाळी उशिरापर्यंत त्यात त्यांना यश येत नव्हते. आग धुमसतच जात होती.

त्यातच इमारतीच्या छपराचा भाग जसजसा पेट घेत होता तसतशी जीर्ण लाकडे खाली कोसळत होती. त्यामुळे छप्परही खाली कोसळण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे कर्मचा-यांना आगीवर नियंत्रण आणण्यात यश येत नव्हते. तसेच छपरावर पाणी मारत असतानाही इमारतीचा काही भाग कोसळला, पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. इमारतीचा समोरचा भाग जसा पेट घेत होता तसा मागील भागही पेट घेत होता. त्यामुळे अग्निशामक कर्मचा-यांना कोणती आग अटोक्यात आणावी हा प्रश्न होता. तरीही हे कर्मचारी आग विझवत होते. यावेळी नागरिकही आग विझिवण्यासाठी मोठी मेहनत घेताना दिसत होते. विद्युत विभागाने ही आग लागताच घटनास्थळी येऊन विद्युत पोलवरून काझी शहाबुद्दीन हॉलचा विद्युत पुरवठा खंडित केला. यामध्ये अग्निशामक कर्मचारी नंदू गावकर, दीपक म्हापसेकर, प्रदीप सावरवाडकर, तुळशीदास नाईक, विनोद सावंत, तिळाजी जाधव, नारायण आंबेरकर, जयवंत जाधव, प्रवीण कांबळे, सत्या सांगेलकर, गणेश बरागडे, दीपक पाटील, सुभाष बिरोडकर, शंकर आसोलकर, जयसिंग धुरी यांच्यासह लिपीक आसावरी शिरोडकर, परवीन शेख यांच्यासह नागरिक सतीश घाडी, शांताराम आकेरकर, दिगंबर सावंत, बाळा भिसे, सचिन इंगळे यांनी आग विझवण्यासाठी सहभाग नोंदवला तर नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, सुधीर आडिवरेकर, अ‍ॅड. परिमल नाईक, उदय नाईक आदी मदत कार्यात सहभागी झाले होते.

काझी शहाबुद्दीन हॉल ही ऐतिहासिक वास्तू असल्याने तिचे बांधकाम करण्याची कोणतीही परवानगी पालिकेकडे नव्हती. त्यामुळे पालिकेने ही इमारत एक हेरिटेज प्रॉपर्टी म्हणून जपणूक सुरू केली होती. अलीकडेच या इमारतीत कचºयावर प्रकिया करणारी मशिन तसेच प्लास्टिक पिशव्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आत ठेवण्यात आलेली मशीन मात्र सुरक्षित स्थळी हलविण्यात पालिकेला यश आले. पण कापडी पिशव्या तसेच इमारतीचा काही भाग जळून पूर्णपणे खाक झाला आहे.

आग लावण्यात आल्याची चर्चा
दरम्यान काझी शहाबुद्दीन हॉलच्या इमारतीला लागलेली आग प्रथम शार्टसर्किटने झाल्याचे बोलले जात होते. मात्र नंतर ही आग कोणीतरी मुद्दामहून लावण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. दोन दिवसांपूर्वी या इमारतीच्या समोरील भागाचा एक दरवाजाही काढून टाकण्यात आला होता. तर सोमवारी दुपारी या इमारतीला आग लावण्यात आली. या इमारतीच्या आतमध्ये कापडी पिशव्या होत्या. त्यालाच ही आग लावण्यात आली असून, त्यानंतर ही आग वाढत गेली. 

नगरपालिका पोलिसात तक्रार देणार : साळगावकर
काझी शहाबुद्दीन हॉलच्या इमारतीला लागलेली आग ही शार्टसर्किट किंवा अन्य कारणांनी नसून ती आग लावण्यात आली आहे. याबाबत पालिका पोलिसात तक्रार देणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. पालिका पोलिसांना योग्य ते सहकार्य करणार असून, सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना देणार आहे. दोन दिवसांपूर्वी या इमारतीचा दरवाजाही तोडून टाकण्यात आला होता. त्याचीही पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Historical Kazi Shahabuddin building fire, suspected of setting fire to unknown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.