बारामतीकरांची मक्तेदारी माेडून काढू, जयकुमार गोरे यांचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 03:48 PM2023-03-13T15:48:07+5:302023-03-13T15:50:21+5:30

बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणारा मुख्यमंत्री खुर्चीवर बसला आणि महाराष्ट्रावर मोठं संकट आलं.

We will end the monopoly of Baramatikars says Jayakumar Gore | बारामतीकरांची मक्तेदारी माेडून काढू, जयकुमार गोरे यांचा घणाघात 

बारामतीकरांची मक्तेदारी माेडून काढू, जयकुमार गोरे यांचा घणाघात 

googlenewsNext

पाचगणी : ‘यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार समजायचं, त्यांच्याच सातारा जिल्ह्यात त्यांनी आपला पक्ष वाढवला; पण ४० वर्षे पाठीशी राहिलेल्या या सातारा जिल्ह्याला त्यांनी काय दिलं, हा प्रश्न आज ही अनुत्तरित आहे. सर्व विकासकेंद्रे बारामतीला नेली, औंधचं संस्थानही त्यांनी ताब्यात घेतलं. त्यांनी दिलं काय ? आता त्यांची मक्तेदारी मोडून काढण्याची वेळ आली आहे,’ असा घणाघात भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे यांनी केला. 

भिलार, ता. महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या सातारा जिल्हा भाजपा कार्यकारिणी बैठक आणि दोन दिवसीय अभ्यासवर्ग शिबिराच्या समारोपप्रसंगी जिल्हाध्यक्ष गोरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे म्हणाले, ‘ज्या योजनेतून अनेकांचे जीव वाचले, अनेकांच्या संसाराला हातभार लागला ती मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना बंद करणारा पहिले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अथक परिश्रमातून तयार केलेला अर्थसंकल्प वाचताना उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचे सुतकी चेहरे पाहण्यासारखे होते. आपण बहुमताने निवडून आलो; पण सत्तेच्या बाहेर राहावं लागलं. बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणारा मुख्यमंत्री खुर्चीवर बसला आणि महाराष्ट्रावर मोठं संकट आलं. वेदना झाल्या; पण आता विचार करण्याची वेळ आली आहे. आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार यासाठी काम सुरू आहे.’

‘पवारांनी संस्थानिक, बँका, सभासद ताब्यात ठेवले आहेत. आपल्या ताब्यात काय आहे ?  त्यांच्या बालेकिल्ल्यातील सातारा जिल्हा बँकेने आजपर्यंत एकही नवा सभासद केला नाही. जिल्ह्यात लढाई विचारांची आहे, ती राष्ट्रवादी बरोबर आहे, त्यांचा पाडाव करण्याची मानसिकता असायला पाहिजे. एवढ्या मोठ्या नेत्यांवर का बोलता ? असं मला अनेकदा सांगितलं जातं; पण मी का कुणाला भ्यावं. मी लोकांसाठी बलिदान दिलं तर बिघडलं कुठं ?  देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत अनोखी ऊर्जा मिळते. प्रत्येक संकटाच्या वेळी फडणवीस पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. प्रत्येक परिस्थितीत मजबुतीने पाठीशी उभा राहणारा भाजप पक्ष आहे, असेही जिल्हाध्यक्ष गोरे यांनी स्पष्ट केले.  

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही मार्गदर्शन केले. दोन दिवस चाललेल्या या मार्गदर्शन शिबिरात विविध मान्यवरांनी कार्यकर्त्यांना विचारांची शिदोरी दिली. 

या शिबिराला जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शिबिराची जबाबदारी महाबळेश्वर तालुक्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. 

सत्तेच्या बदल्यात जिल्ह्यातील पाणी तिकडं पळवलं...

दोन दिवसांच्या या शिबिरातून कार्यकर्त्यांनी सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी  कामाला लागावे. आगामी काळात जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेण्याबरोबरच जिल्ह्यात जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूयात. 
फलटणकरांनी कायम बारामतीकरांशी गोड बोलून सत्तेची भूक भागवली; पण त्यांच्या सत्तेच्या बदल्यात जिल्ह्यातील पाणी तिकडं पळवलं, हे पाप फलटणकरांनी जिल्ह्याच्या माथी मारलं, असे गोरे म्हणाले.

Web Title: We will end the monopoly of Baramatikars says Jayakumar Gore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.