कोयनानगरला पावसाने हजारी ओलांडली, आतापर्यंत ११३३ मिलीमीटरची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 13:49 IST2018-07-04T13:46:27+5:302018-07-04T13:49:58+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली असून, कोयनेत जोर वाढू लागला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८२ तर आतापर्यंत ११३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. साताºयातही सकाळपासूनच रिमझिम सुरू होती.

कोयनानगरला पावसाने हजारी ओलांडली, आतापर्यंत ११३३ मिलीमीटरची नोंद
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली असून, कोयनेत जोर वाढू लागला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८२ तर आतापर्यंत ११३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. साताऱ्यातही सकाळपासूनच रिमझिम सुरू होती.
जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने वेळेत हजेरी लावली. सुरुवातीला काही दिवस पाऊस कोसळला. पश्चिम भागासह पूर्व दुष्काळी भागातही दमदार पाऊस बरसला. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली. काही दिवसांच्या अवधीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला.
गेल्या एक महिन्याच्या काळात पावसाने तीनवेळा उघडीप दिली आणि पुन्हा हजेरी लावली. गेले चार दिवस पावसाने जिल्ह्यात उघडीप दिली होती. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी होऊ लागली होती. मात्र, सोमवार दुपारपासून पुन्हा पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
कोयना धरण परिसरात पावसाचा जोर अधिक आहे. कोयनानगर येथे मंगळवारी सकाळी अवघा ४७ मिलीमीटर पाऊस झाला होता. तर बुधवारी सकाळपर्यंत ८२ मिलीमीटर पाऊस झाला.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये
- धोम ०३ (१४१)
- कोयना ८२ (११३३)
- बलकवडी १२ (३९७)
- कण्हेर १८ (१४७)
- उरमोडी १२ (१८३)
- तारळी २० (३५०)