सातारा: video चांदोबाचा लिंबमध्ये माउलींचे पहिले रिंगण उत्साहात, वरुणराजाचीही हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 05:47 PM2022-06-30T17:47:57+5:302022-06-30T18:14:41+5:30

‘माऊली... माऊली....’ असा गगनभेदी घुमणारा आवाज..., लाखो वारकऱ्यांच्या ताणलेल्या नजरा अन् रोखलेला श्वास अशातच वैष्णवांच्या मेळ्यातून माउलींच्या व अश्वांनी नेत्रदीपक दौड घेत उपस्थित वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

The first standing rigan of Shri Sant Dnyaneshwar Mauli Wari was held at Chandobacha Limb in Phaltan taluka on Thursday evening | सातारा: video चांदोबाचा लिंबमध्ये माउलींचे पहिले रिंगण उत्साहात, वरुणराजाचीही हजेरी

फोटो- प्रशांत रणवरे

googlenewsNext

तरडगाव : ‘माऊली... माऊली....’ असा गगनभेदी घुमणारा आवाज..., लाखो वारकऱ्यांच्या ताणलेल्या नजरा अन् रोखलेला श्वास अशातच वैष्णवांच्या मेळ्यातून माउलींच्या व अश्वांनी नेत्रदीपक दौड घेत उपस्थित वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या वारीतील पहिले उभे रिंगण फलटण तालुक्यातील चांदोबाचा लिंब येथे गुरुवारी सायंकाळी पार पडले. यावेळी वरुणराजानेही हजेरी लावली.

लोणंद येथील अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा गुरुवारी दुपारी सुमारास खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश करण्यासाठी मार्गस्थ झाला. तालुक्याच्या सीमेवर दुपारी सरदेचा ओढा येथे फलटण तालुक्याच्या वतीने आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, जिल्हा परिषदचे सदस्य दत्ता अनपट यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

गेली दोन वर्षे रिंगण सोहळा न पाहता आल्याने भाविकांना वेध लागले होते. यामुळेच साऱ्यांची पावलेही आपोआप रिंगणस्थळी पडत होती. हा सोहळा पाहता यावा म्हणून महिलांसह अनेक वारकरी आधीच गर्दी करून बसले होते. दुपारी सव्वातीन वाजता माऊलींचा पारंपरिक मानाचा नगारखाना आला. त्यानंतर काही वेळाने पालखी रथ मंदिरासमोर आल्यावर कमालीची उत्सुकता ताणली गेली. यावेळी वैष्णवांच्या उत्साहाने सारा आसमंत भक्तिरसात चिंब झाला होता.

रिंगणस्थळी रिंगण लावून घेतल्यावर क्षणार्धात साऱ्यांचे डोळे गर्दीतून धावत येणाऱ्या अश्वाकडे लागले होते. चोपदारांनी हात उंचावून इशारा करताच दुतर्फा वैष्णवांच्या मेळ्यातून माऊलींचा व स्वाराचा अश्व एका पाठोपाठ धावत सुटले. रथा पुढील व मागील दिंड्यांपर्यंत धावत जाऊन पुन्हा माघारी असंख्य डोळ्यांचे पारणे फेडणारी दौड घेत वारीतील पहिले उभे रिंगण पूर्ण केले.

वर्षातून एकदाच पाहावयास मिळणारा हा सोहळा प्रत्येकाने आपल्या डोळ्यात साठवत माऊलींचा गजर करीत अश्वाच्या टापाची माती ललाटी लावत धन्य झाल्याची भावना व्यक्त केली. त्यानंतर महिलांसह भाविकांनी फुगड्या, फेर धरत पारंपरिक खेळ करीत मनसोक्त आनंद लुटला. यावेळी अश्वाचा स्पर्श व पालखीतील माउलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी झुंबड उडाली. त्यानंतर मोठ्या भक्तिभावाने डोक्यावर तुळशी वृंदावन, भगवी पताका घेत तरडगाव मुक्कामासाठी वारकरी मार्गस्थ झाले.


Web Title: The first standing rigan of Shri Sant Dnyaneshwar Mauli Wari was held at Chandobacha Limb in Phaltan taluka on Thursday evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.