शिक्षक बदलीचा बार दिवाळीनंतरही फुसकाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 14:35 IST2017-10-25T14:30:55+5:302017-10-25T14:35:20+5:30
ग्रामीण भागात भौतिक सुविधा पुरेशा नसतानाही प्राथमिक शाळांचा दर्जा उत्तम ठेवण्याचे काम प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे करत आहेत. अशा शिक्षण खात्यात ग्रामविकास विभागाने एका क्लीकवर बदलीची प्रक्रिया थेट मंत्रालयातून सुरू केली आहे. परंतु ही प्रक्रिया अर्धे शैक्षणिक वर्ष संपले तरी पूर्ण झाली नाही. दिवाळीनंतर बदल्यांचा हा फटाका फुटेल, अशी आशा होती. मात्र, तीही आता फोल ठरली आहे.

शिक्षक बदलीचा बार दिवाळीनंतरही फुसकाच !
सायगाव ,दि. २५ : ग्रामीण भागात भौतिक सुविधा पुरेशा नसतानाही प्राथमिक शाळांचा दर्जा उत्तम ठेवण्याचे काम प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे करत आहेत. अशा शिक्षण खात्यात एका क्लीकवर बदलीची प्रक्रिया थेट मंत्रालयातून ग्रामविकास विभागाने सुरू केली आहे. परंतु ही प्रक्रिया अर्धे शैक्षणिक वर्ष संपले तरी पूर्ण झाली नाही. दिवाळीनंतर बदल्यांचा हा फटाका फुटेल, अशी आशा होती. मात्र, तीही आता फोल ठरली आहे.
संवर्ग तीन व चारमधील बदली पात्र शिक्षकांना आॅनलाईन फॉर्म बदली पोर्टलवर भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे फॉर्म भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे ऐन दिवाळी सुटीही शिक्षकांना संगणकावर माहिती भरण्याच्या कामाताच घालवावी लागत आहे.
गेल्या चार दिवसांपासून शिक्षकांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे बदली पोर्टलच्या सावळ्या गोंधळात शिक्षक भरडला जात आहे. जावळी, महाबळेश्वर, पाटणसारख्या दुर्गम तालुक्यात नेट कॅफेच नसल्यामुळे येथील शिक्षकांना सातारा शहरात येऊन किंवा तालुक्याच्या ठिकाणी येऊनच माहिती भरावी लागत आहे.
सध्या पोर्टलवर माहिती भरताना अनेक अडचणींचा सामना शिक्षकांना करावा लागत आहे. त्यातच ही माहिती भरण्यासाठी २५ आॅक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंतची मुदत देण्यात आल्याने शिक्षकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या पोर्टलवर शिक्षक वेळेत माहिती भरूच शकत नाहीत.
यासंदर्भात शिक्षक समिती, संघटनांमधून आॅफलाईन फॉर्म घेऊन बदली प्रकिया करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. एकव दोन संवर्गातील बदल्या पूर्ण झाल्यामुळे ते शिक्षक सुपात आहेत. तर तिसरा संवर्ग पुन्हा एकदा पोर्टल भरायला लावल्यामुळे गोत्यात तर चौथा जात्यातच आहे. अशी परिस्थिती प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची झाली आहे.
शासन आदेशामुळे शिक्षक संभ्रमात
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन आदेशानुसार नवीन धोरण तयार करण्यात आले. मात्र, मे २०१७ मध्ये होणºया या बदल्यांना न्यायालयीन प्रक्रियेमुळे विलंब होत गेला. त्यामुळे शासनाने यावर्षी कमीत-कमी बदल्यांच्या अनुषंगाने १२ सप्टेंबर रोजी सुधारित शासन निर्णय काढला. या निर्णयाला संघटनांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
न्यायालयाने शासनाच्या १२ सप्टेंबरच्या शासन आदेशास स्थगिती दिल्यामुळे शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या या २७ फेब्रुवारीच्या धोरणानुसारच करण्यात याव्यात, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हाअंतर्गत शिक्षक बदल्याच्या संख्येत वाढ होणार, हे निश्चित.
शासनाने संवर्ग निर्माण करून शिक्षकांमध्ये एकप्रकारे फूट पडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शासनाचा बदल्यांचा हेतू शुद्ध नाही. बदलीचा खरा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाच आहे. तरी देखील मंत्रालय स्तरावरून ही प्रक्रिया राबविली जात आहे. त्यातही ज्या तांत्रिक बाबी राहत आहेत.
- दीपक भुजबळ, जिल्हा अध्यक्ष (दोंदे गट)
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ