अवकाळी पावसामुळे अकाली नुकसान ! माणमध्ये तिघेजण जखमी :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 11:56 PM2018-05-10T23:56:07+5:302018-05-10T23:56:07+5:30
म्हसवड/दहिवडी : माण तालुक्यातील गोंदवले, किरकसाल परिसरात गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने
घरे, गोठ्यावरील पत्रे उडाले, खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित; कुसूरमध्ये गारा
म्हसवड/दहिवडी : माण तालुक्यातील गोंदवले, किरकसाल परिसरात गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने काही घरांचे पत्रे उडून गेले. तसेच विजेचे खांब, झाडे पडल्याने मोठं नुकसान झालं आहे. पत्रा उडून जाणे व भिंत पडल्याने तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.
गोंदवले, किरकसाल परिसरात गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वाºयाला सुरुवात झाली. या वाºयाने मोठी झाडे वेगाने हलू लागली. त्यातच काही झाडे पडली आणि तीव्र आवाज होऊन वीज कडाडली. त्यानंतर लहान गारांसह पावसाने हजेरी लावली. हा पाऊस दहा मिनिटांत बंद झाला. या वाºयामुळे गोंदवलेत सहा ते सात झाडे पडली. काही ठिकाणी विद्युत तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला. गावानजीक शेतात राजेंद्र माने यांचा जनावराचा गोठा असून, पत्रा वाºयाने उडून पडला. यात लोखंडी अँगलही वाकून गेले. पत्रा उडाला त्यावेळी रोहित माने हा शालेय मुलगा त्याच खोलीत होता, तो बचावला. तर पांडुरंग पोळ यांच्याही जनावरांच्या गोठ्यावरील पत्रा या वाºयाने सुमारे १०० फूट लांब जाऊन पडला.
दरम्यान, किरकसाल येथेही या वादळी वाºयाने सुमारे १२ घरांवरील पत्रे उडून जाऊन विद्युत खांब पडल्याची माहिती मिळत आहे. येथे ८ राहत्या घरांचे छत, पत्रा, लोखंड, कौले उडून गेली आहेत. त्यामुळे ८ कुटुंबे बेघर झाली आहेत. यामध्ये बबन विठ्ठल काटकर यांच्या घराचा पत्रा आणि लोखंडाचा छत उडूनगेला.त्याचबरोबर भिंत पडून अविता
अमोल काटकर (वय ३५) यांचा पाय फॅ्रक्चर झाला. वरद अमोल काटकर (वय ५) याचा हात फॅ्रक्चर झालेला आहे. श्वेता शैलेंद्र भोसले (१३) ही जखमी झालेली आहे. सदाशिव रघुनाथ काटकर यांच्या घराचे छत पत्र्यासह उडून जाऊन १०० फूट अंतरावर पडले. अशाचप्रकारे इतरांचेही नुकसान झाले आहे.
वीज वितरण कंपनीचे सुमारे तीन पोल पडलेले असून, ९ पोल पडण्याच्या स्थितीत आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी तारा तुटलेल्या आहेत. तसेच मोठमोठी अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे किरकसाल गावचा आणि परिसराचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे.
रहिमतपूर परिसराला झोडपले
रहिमतपूर : वादळी वाºयासह आलेल्या जोरदार पावसाने रहिमतपूर शहराला सुमारे अर्धा तास झोडपून काढले. पावसाचा जोर प्रचंड असल्यामुळे काही वेळातच सर्वत्र पाणी पाणी पाणी झाले. ऊसतोडी सुरू असलेल्या ठिकाणी मजुरांची तर रहिमतपूर येथील आठवडा बाजारात पावसामुळे शेतकरी आणि व्यापाºयांची दैना उडाली.
रहिमतपुरात गुरुवारी सकाळपासून कडक ऊन होते. दुपारी अडीचच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वारा सुटला. काही वेळातच वादळी पावसाला सुरुवातही झाली. गुरुवारी आठवडी बाजार होता. त्यामुळे गांधी चौक ते रोकडेश्वर मंदिर यादरम्यान बाजार भरला होता. भाजीपाला, फळे विक्रीसाठी शेतकरी व व्यापाºयांनी तंबू ठोकले होते.
मात्र, वादळी पावसामुळे अनेकांचे तंबू उडाले तर काहींचे भुईसपाट झाले. त्यामुळे सर्वांची दैना उडाली.
पावसाबरोबर वाºयाचा वेग जोरदार असल्यामुळे अनेकांनी सावरासावर करून विक्रीसाठी आणलेला भाजीपाला तळवटाने झाकून ठेवला. पावसापासून बचावासाठी अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला. मात्र पावसाचा जोर जास्त असल्यामुळे अनेकांचा भाजीपाला भिजला.
सुमारे अर्धा तास कोसळलेल्या पावसामुळे ऐन दुपारी रहिमतपूरच्या बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता. पाऊस उघडल्यानंतर काही वेळानंतर पुन्हा भाजीपाला खरेदीसाठी गर्दी झाली.
दरम्यान ऊसतोडी सुरू असलेल्या ठिकाणी पावसामुळे मजुरांची दैना उडाली. दरम्यान, परिसरातील साप, अपशिंगे, वेळू, पिंपरी, बोरीव आदी गावांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसाने अनेकांची दैना उडाली.