काळज-तडवळे-मुरुम रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य!
By admin | Published: June 19, 2017 04:04 PM2017-06-19T16:04:25+5:302017-06-19T16:04:25+5:30
अनधिकृतरीत्या चर खोदणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
आॅनलाईन लोकमत
फलटण , दि. १९ : तालुक्यातील काळज-तडवळे-मुरुम रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करून वाहनचालकांना कोणी दिलासा देईल का? असा केविलवाणा प्रश्न या रस्त्यावरुन ये-जा करणारे वाहनचालक विचारत आहेत.
बारामती तालुक्यातील मुरुम व इतर गावांना जाण्यासाठी काळज -खराडेवाडी-मुरुम या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले असून, एक खड्डा चुकवण्याच्या नादात अक्षरश: रोज या रस्त्यावर छोटे -मोठे अपघात घडताना दिसत आहेत. यामुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
रस्त्यावरच्या मोठ्या खड्ड्यांमुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा या संभ्रमात वाहनचालक पडले आहेत. फलटण तालुक्यातील अनेक लोक या मागार्ने बारामती तालुक्यातील गावांना जात असतात. मुरुम येथे बारामती-फलटण या सरहद्दीवर मोठा पूलही बांधण्यात आला आहे. परंतु या ठिकाणी जवळजवळ पाचशे मीटर मातीचा कच्चा रस्ता आहे व साधारण सहा-सात किलोमीटरच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने हा रस्ता लवकर दुरुस्त व्हावा तसेच विविध ठिकाणी अनधिकृतरीत्या चर खोदणाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.