कारमधून स्फोटक पदार्थाची वाहतूक; व्यावसायिकाला अटक

By दत्ता यादव | Published: April 10, 2024 08:30 PM2024-04-10T20:30:52+5:302024-04-10T20:31:08+5:30

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; तब्बल ४०० नायट्रेटच्या कांड्या जप्त

Carriage of explosives; Businessman arrested in satara | कारमधून स्फोटक पदार्थाची वाहतूक; व्यावसायिकाला अटक

कारमधून स्फोटक पदार्थाची वाहतूक; व्यावसायिकाला अटक

सातारा : कारमधून नायट्रेट या स्फोटक पदार्थाच्या कांड्यांची असुरक्षितरीत्या वाहतूक करत असताना स्थानिक गुन्हे शाखेने एका व्यावसायिकाला अटक केली. त्याच्या ताब्यातून कार आणि ४०० स्फोटक पदार्थाच्या कांड्या पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई मंगळवार, दि. ९ रोजी रात्री आठ वाजता रायगाव फाटा, ता. जावळी येथे करण्यात आली.

पोपट नाना बिचुकले (वय २९, रा. हणमंतवाडी, आदर्की खुर्द, ता. फलटण, जि. सातारा), असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रायगाव फाटा, ता. जावळी येथे एक व्यक्ती कारमधून स्फोटक पदार्थाच्या कांड्या विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पाटील यांच्या पथकाने रायगाव फाटा येथे दि. ९ रोजी रात्री आठ वाजता सापळा लावला. सातारा बाजूकडून कार (एमएच ११ डीएच १४१५) येताच पोलिसांनी अडवली. त्यानंतर कारची झडती घेतली असता कारमध्ये नायट्रेटच्या तब्बल ४०० कांड्या आढळून आल्या. या कांड्यांसह पोलिसांनी कारसुद्धा जप्त केली. तसेच बिचुकले याला अटक करून पुढील कारवाईसाठी भुईंज पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, सुधीर पाटील, रोहित फार्णे, पृश्वीराज ताटे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, तानाजी माने आदींनी ही कारवाई केली.

स्फोटके आणली औंध येथून...

पोपट बिचुकले याचा विहीर खुदाईसाठी लागणाऱ्या स्फोटक विक्रीचा व्यवसाय आहे. परंतु त्याने ही स्फोटके असुरक्षितपणे हाताळल्याने तसेच बेकायदा वाहतूक केल्याने त्याच्यावर ही कारवाई केली असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी सांगितले. ही स्फोटके औंध येथून त्याने आणली असल्याचे तपासात समोर येत आहे.    

Web Title: Carriage of explosives; Businessman arrested in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.