मराठी पदावर साकारले भरतनाट्यम्
By Admin | Updated: February 12, 2015 00:35 IST2015-02-11T21:33:43+5:302015-02-12T00:35:26+5:30
नटराज महोत्सव : एकाच वेळी सादर झाली शिल्प, चित्र आणि नृत्यकला

मराठी पदावर साकारले भरतनाट्यम्
सातारा : नृत्यसंवाद मुंबई, अल्टिट्यूड पुणे, स्रेहललीत कला केंद्र व नादबह्म केंद्र पुणे, या चार नृत्य संस्थेंच्या गुरू स्मीता महाजन साठे यांच्या १३ शिष्यांच्या मराठी रचनांवरील बहारदार भरतनाट्यम् नृत्यांनी नटराज संगीत-नृत्य महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसी उपस्थितांची मने जिंकून घेतली. आपल्या निपूण पद्लालित्य आणि सर्वांग सुंदर भावमुद्रांचा सुरेख नजारा नृत्यांतून यावेळी पाहण्यास मिळाला.कार्यक्रमाची सुरुवात कलाकारांनी विद्येची देवता गजाननाच्या ‘गाईये गणपती जगवंदन’ या संत तुलसीदासांनी रचलेल्या ‘मोहनम्’ रागातील आदितालात बद्ध असलेल्या रचनेवर सादर केली. त्यानंतर ‘हंसध्वनी’ रागातील आदितालातील पुष्पांजली सादर करत ‘माया माळगौडा’ रागातील ‘आडी कोंडर’ ही तमीळ पदावर रचना व त्यातील नृत्य सादर झाले. नृत्य देवता नटराजाचे नृत्य व त्याचे वर्णन असणारे ‘चिदंबरनाथ’ हे पद आपल्या नृत्यातून निवेदिता बडवे या कलाकाराने सफाईदारपणे सादर केले. मराठीतील ‘अजि सोनियाचा दिवस’ या पदावर मिताली व सुमेधा राणे या दोघींनी नृत्य सादर करताना त्यातील अभिनय व भावमुद्रा अतिशय सहजपणे दाखवत हा अविष्कार केला. नृत्यामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांचा सत्कार नृत्य मार्गदर्शिका व कलाविष्कार भरतनाट्यम् नृत्य संस्थेच्या गुरू अस्मिता भालेराव यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रशस्तिपत्रे देऊन करण्यात आला. यावेळी उषा शानभाग, आंचल घोरपडे, रमेश शानभाग, वेदमूर्ती जगदीशशास्त्री भट, व्यस्थापक चंद्रन, नारायण राव, मुकुंद मोघे आदी मान्यवर उपस्थित
होते. (प्रतिनिधी)