धावत्या दुचाकीवरुन महिलेची पर्स लंपास, सांगलीतील घटना : चोरट्यांचा पाठलाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 16:03 IST2017-12-14T16:00:06+5:302017-12-14T16:03:15+5:30
दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या गणेशनगरमधील शिल्पा सुकेश गौडा या महिलेची दुचाकीला अडकविलेली पर्स चोरट्यांनी हातोहात लंपास केली. माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा औद्योगिक वसाहतमध्ये बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. शिल्पा गौडा यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. पण ते सापडले नाहीत.

धावत्या दुचाकीवरुन महिलेची पर्स लंपास, सांगलीतील घटना : चोरट्यांचा पाठलाग
सांगली : दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या गणेशनगरमधील शिल्पा सुकेश गौडा या महिलेची दुचाकीला अडकविलेली पर्स चोरट्यांनी हातोहात लंपास केली. माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा औद्योगिक वसाहतमध्ये बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. शिल्पा गौडा यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. पण ते सापडले नाहीत.
शिल्पा गौडा यांचे कुपवाड रस्त्यावरील शालिनीनगर माहेर आहे. त्या सांगलीत गणेशनगरमध्ये राहतात. बुधवारी दुपारी त्या दुचाकीवरुन माहेरी नातेवाईकांना भेटण्यास गेल्या होत्या. सायंकाळी साडेसहा वाजता त्या सासरी गणेशनगरमध्ये जाण्यास निघाल्या. अहिल्यानगरमार्गे त्या वसंतदादा औद्योगिक वसाहतमध्ये आल्या.
दुरसंचार कार्यालयासमोर आल्यानंतर त्यांच्या पाठीमागून एक दुचाकी आली. दुचाकीवर दोन चोरटे होते. यातील पाठीमागील चोरट्याने शिल्पा यांची दुचाकीच्या हॅण्डलला अडकविलेली पर्स हातोहात लंपास केली. त्यानंतर दोघेही वसाहतच्या कमानीतून बाहेर पडून सांगलीच्यादिशेने गेले.
शिल्पा यांनी डेक्कन मॅन्युफॅक्चरींग हॉलपर्यंत पाठलाग केला. पण दोन्ही चोरटे रस्त्यावरील वाहनाच्या गर्दीचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले. पर्समध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स, दोन मोबाईल व साडेती हजाराची रोकड होती. याबाबत शिल्पा गौडा यांनी गुरुवारी सकाळी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.