अपघातात तीन विद्यार्थी ठार, दोघे गंभीर जखमी, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:46 IST2018-01-10T00:46:37+5:302018-01-10T00:46:49+5:30
लोणावळा येथे मौजमजा करण्यासाठी चाललेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गाडीला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. यात तीन जण ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात मंगळवारी सकाळी ९.३० वाजता खालापूर टोल नाक्याच्या आधी धामणी गावानजीक घडला.

अपघातात तीन विद्यार्थी ठार, दोघे गंभीर जखमी, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील दुर्घटना
वावोशी (रायगड) : लोणावळा येथे मौजमजा करण्यासाठी चाललेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गाडीला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. यात तीन जण ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात मंगळवारी सकाळी ९.३० वाजता खालापूर टोल नाक्याच्या आधी धामणी गावानजीक घडला.
कुर्ला, ठाणे व गोवंडी येथे राहणारे आणि वाशी येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी लोणावळा येथे पिकनिकला निघाले होते. इनोव्हा आणि पोलो कार अशा दोन गाड्यांमधून विद्यार्थी लोणावळाच्या दिशेने निघाले होते. पुढे असलेल्या टेम्पोच्या वेगाचा अंदाज न आल्यामुळे पोलो कारची (आरजे-२१-सीबी-८३३) जोरदार धडक टेम्पोला बसली. कारमध्ये असलेले अनास शेख (१९), स्वेदा दुबे (१९) यांचा जागीच मृत्यू झाला, तर श्रद्धा मौर्य (१९) हिचा उपचारासाठी नेताना रस्त्यातच मृत्यू झाला. जखमी रजिवान व नीलेश (पूर्ण नाव समजले नाही) यांना उपचारासाठी एमजीएम कामोठे येथे हलविण्यात आले असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले आहे.