रायगड : जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ४,००७ होळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:39 AM2018-03-01T02:39:39+5:302018-03-01T02:39:39+5:30
होळी पौर्णिमेचा सण रायगड जिल्ह्यात गुरुवारी मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये चार हजार सात होळ्या लागणार आहेत.
विशेष प्रतिनिधी
अलिबाग : होळी पौर्णिमेचा सण रायगड जिल्ह्यात गुरुवारी मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये चार हजार सात होळ्या लागणार आहेत. शुक्रवारी लगेचच धुळवड साजरी होणार आहे. तत्पूर्वी कोळी समाजात होळीच्या आदल्या दिवशीच होलिकोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे कोळीवाड्यांमध्ये होळीची चांगलीच धूम सुरू होती.
रायगड जिल्ह्यात होळी पौर्णिमा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शहरीकरणामुळे होळी सणानिमित्त होणारे कार्यक्र म दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. कोळी समाजाच्या वतीने होळी सणानिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग समुद्रकिनारी धूलिवंदनाच्या दिवशी बैलगाडी शर्यतींचा थरार अनुभवायला मिळत होता. मात्र, न्यायालयाच्या बंदीमुळे गेल्या काही वर्षांपासून या बैलगाडी शर्यती बंद आहेत.
जिल्ह्यात गुरु वारी सार्वजनिक दोन हजार ८८५ आणि खासगी एक हजार १२२ अशा एकूण चार हजार सात होळ्या लागणार आहेत. शुक्र वारी सर्वत्र धुळवड साजरी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. धुळवडीनिमित्त बाजारपेठा वेगवेगळे रंग, पिचकाºयांनी सजल्या आहेत. होळी पौर्णिमा, धूलिवंदन या सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटक रायगड जिल्ह्यात पर्यटनासाठी येत असतात. या वेळेलाही त्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. होलिकोत्सव आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस विभागाने वडखळ, कर्जत, माणगाव, महाड, श्रीवर्धन येथे पोलीस पथके तैनात केली आहेत.
होळी सणाला आधुनिक तेची साथ
लोकमत न्यूज नेटवर्क
वडखळ : रायगड जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वेळी विशेषत: नाच गाण्याचा कार्यक्र म असल्याने या वेळी डीजेचा वापर केला जात असून पारंपरिक वाद्याबरोबर डीजे आणि लेझर लाइट या आधुनिकतेची साथ होळी उत्सवाला मिळत आहे.
रायगड जिल्ह्यात होळी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात असून खारेपाटात सावरीच्या झाडाची होळी जंगलातून आणली जाते. ही होळी आणण्यासाठी गावातील तरु ण मंडळींसोबत ज्येष्ठ मंडळी सुद्धा जंगलात जातात. या वेळी जंगल सफर होत असून वन भोजनाचा कार्यक्र म आखला जातो. होळीच्या पाच दिवस अगोदर होळी नाचत गाजत गुलाल उधळत गावात आणली जाते. होळीच्या दिवशी स्त्रिया पारंपरिक वेशभूषा करून होळीची पूजा करतात व रात्री १२ वाजता होळीचा होम रचून होळी लावली जाते. या वेळी महिला होळीची पारंपरिक गाणी गातात, या वेळी होळीमध्ये नारळ टाकले जातात. तदनंतर या नारळाचा प्रसाद सर्वांना वाटला जातो. होळी उत्सवात रंगपंचमीपर्यंत विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येते.