खूप अभ्यास कर मोठी हो..! स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा इर्शाळवाडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 08:29 PM2023-08-15T20:29:59+5:302023-08-15T20:30:34+5:30

मुख्यमंत्र्यांनी निवास व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी काही धरांमध्ये जाऊन तेथील सुविधेची पाहणी करताना त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला.

On Independence Day, Chief Minister Eknath Shinde again reached at Irshalwadi | खूप अभ्यास कर मोठी हो..! स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा इर्शाळवाडीत

खूप अभ्यास कर मोठी हो..! स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा इर्शाळवाडीत

googlenewsNext

मुंबई - इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री इर्शाळवाडीवासियांचे अश्रू पुसण्यासाठी आले. शासन भक्कमपणे पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था सहा महिन्यात होईल असा विश्वास स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी तिरंग्याच्या साक्षीने गावकऱ्यांना दिली.

दिवसभरातील स्वातंत्र्य दिनानिमित्तचे कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री शिंदे सायंकाळी चारच्या सुमारास इर्शाळवाडीवासियांच्या तात्पुरत्या निवासाची सोय केलेल्या ठिकाणी पोहचले. मुख्यमंत्र्यांनी निवास व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी काही धरांमध्ये जाऊन तेथील सुविधेची पाहणी करताना त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला.

गेल्या महिन्यात २० जुलैला इर्शाळवाडी दुर्घटना झाली होती. त्यातून बचावलेल्या नागरिकांच्या निवासाची सोय मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून याठिकाणी करण्यात आली आहे. सुमारे ४२ कंटेरनरमध्ये या नागरिकांची सोय करण्यात आली आहे. शिवाय अन्य दहा कंटेनरमध्ये दवाखाना, अंगणवाडी, पोलिस नियंत्रण कक्ष, आपत्कालिन नियंत्रण कक्ष आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्या दिवशी इर्शाळवाडी दुर्घटना घडली त्यादिवशी मुख्यमंत्री विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देखील दिवसभर त्याठिकाणी तळ ठोकून होते. मदत आणि बचावकार्यासाठी मुख्यमंत्री आवश्यक त्या सूचना देत होते एवढेच नाही तर प्रतिकुल परिस्थितीतही भर पावसात शिंदे चार तासांची पायपीट करून इर्शाळगडाजवळ जाऊन आले आणि दुर्घटनास्थळाची तसेच बचावकार्याची पाहणी करून आले.

या घटनेला महिना होण्याच्या आतच आज मुख्यमंत्री पुन्हा इर्शाळवाडीवासियांच्या भेटीसाठी आले. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या कुटुंबातील आप्तस्वकीयांना गमावले  त्यांना आपुलकीने धीर दिला. जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी सातत्याने गावकऱ्यांच्या संपर्कात आहेत. जे जीव वाचलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा उभारी देण्याचं काम शासनातर्फे होत आहे याची प्रचिती आजच्या या दौऱ्यामध्ये दिसून आली. स्वतः मुख्यमंत्री घरात जाऊन पाहणी करीत होते. ३६ क्रमांकाच्या घरातील गणपत पारधी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. सुविधांची पाहणी केली. तेथील चिमुकल्यांशी ते बोलले..महिलांशी संवाद साधत त्यांचे दुःख जाणून घेतले.

खूप अभ्यास कर मोठी हो..

एका घरात एक लहानगी अभ्यास करीत होती. तिच्याशी संवाद साधत खूप अभ्यास कर मोठी हो. असे सांगताना मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवून मुख्यमंत्र्यांनी तिला आशीर्वादच दिला. याठिकाणी गावकऱ्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतल्या. त्यावर शासन नक्कीच उपाययोजना करेल अशी ग्वाही दिली. त्यांच्या सोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनीधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी देखील उपस्थित होते.

Web Title: On Independence Day, Chief Minister Eknath Shinde again reached at Irshalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.