तालुक्यात पोषण आहार वाटप ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 01:06 AM2018-03-27T01:06:53+5:302018-03-27T01:06:53+5:30
खालापूर तालुक्यात उघडकीस आलेला आणि रायगड जिल्हा परिषदेपर्यंत धागेदोरे असलेला कोट्यवधींचा पोषक आहार
अमोल पाटील
खालापूर : खालापूर तालुक्यात उघडकीस आलेला आणि रायगड जिल्हा परिषदेपर्यंत धागेदोरे असलेला कोट्यवधींचा पोषक आहार घोटाळा उघडकीस येऊन तब्बल दोन महिने उलटले आहे. तेव्हापासून आजतागायत तालुक्यातील पोषक आहाराचे वाटप ठप्प झाले आहे. त्यामुळे दुर्गम भागातील वाड्यावस्तीवर कुपोषणाची समस्या पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खालापूर तालुक्यात चौक हद्दीतील तुपगाव येथील कारखान्यातून स्वयंसिद्धा महिला बचत गटामार्फत गरोदर व स्तनदा महिला व बालकांसाठी पोषक आहार पुरविण्यात येत होता. परंतु शासनाने ठरवून दिलेल्या वजनापेक्षा कमी वजनाचा पोषक आहार सीलबंद केला जात असल्याची माहिती खालापूर पंचायत समिती सभापती श्रद्धा साखरे यांना मिळाल्यानंतर २४ जानेवारीला रात्री सभापती साखरे, उपसभापती विश्वनाथ पाटील, सहायक गटविकास अधिकारी पोळ, सुमित खेडेकर, एकात्मिक बालविकासचे चांदेकर यांनी खालापूर पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांच्या मदतीने तुपगाव येथील कारखान्यात पाहणी केली. त्यावेळी त्याठिकाणी पोषक आहाराची १४६८ पाकिटे जवळपास चाळीस टक्के कमी वजनाची भरलेली आढळली. पोलिसांनी ५७,१०० रुपयांचा माल जप्त केला होता. त्यानंतर एकात्मिक बालविकासचे प्रकल्प अधिकारी जयपाल राजाराम गहाणे (५६) यांच्यासह आठ जणांना याप्रकरणी अटक झाली होती, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा महिला व बालकल्याण विभागाचा कार्यभार सांभाळणारा महेंद्र गायकवाड हा फरारी आहे. पोषण आहार घोटाळ्यानंतर खालापूर तालुक्यातील(टीएचआर) घरपोच आहार योजना खंडित झाली असून बालके, गरोदर व स्तनदा माता यांची थाळी रिकामीच आहे. खालापूर तालुक्यात फेब्रुवारी २०१८ च्या आकडेवारीनुसार शून्य ते सहा वयोगटातील बालकांची संख्या ७४३६ असून त्यामध्ये ० ते ३ वर्षे वयाची ३७१८ बालके तर ३ ते ६ वर्षे वयाची देखील ३७१८ बालके असल्याची नोंद आहे. याशिवाय तालुक्यात गरोदर मातांची संख्या १५१५ असून स्तनदा मातांची संख्या १५१५ आहे. या सर्वांना गेल्या दोन महिन्यापासून पोषक आहाराचे वाटप झालेले नाही. याबाबत खालापुरातील एकात्मिक बालविकास कार्यालयात विचारणा केल्यानंतर पोषक आहार सुरू करण्यासाठी तीन वेळा जिल्हा परिषद कार्यालय अलिबाग येथे पत्रव्यवहार केल्याची माहिती तेथील कर्मचारी बोरकर यांनी दिली. पोषक आहारात घोटाळा करणारे सध्या जामिनावर सुटले असले तरी आहार पुरवठा पूर्ववत झालेला नाही.