दिशादर्शक फलक गवतामुळे दिसेनासे
By Admin | Updated: October 8, 2015 23:29 IST2015-10-08T23:29:00+5:302015-10-08T23:29:00+5:30
पावसामध्ये उगवलेल्या गवतामुळे तसेच झाडांच्या वाढीमुळे टोळ, आंबेत, म्हाप्रल, दापोली मार्गावरील दिशादर्शक व मार्गदर्शक फलक झाकले गेल्याने रात्रीच्यावेळी या मार्गावरुन जाणाऱ्या

दिशादर्शक फलक गवतामुळे दिसेनासे
दासगाव : पावसामध्ये उगवलेल्या गवतामुळे तसेच झाडांच्या वाढीमुळे टोळ, आंबेत, म्हाप्रल, दापोली मार्गावरील दिशादर्शक व मार्गदर्शक फलक झाकले गेल्याने रात्रीच्यावेळी या मार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालकांना धोकादायक वळणांचा अंदाज येत नसून या मार्गावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देवून हे गवत कापावे, अशी मागणी प्रवासी आणि वाहन चालकांकडून होत आहे.
टोळ, आंबेत म्हाप्रल मार्ग हा दापोली, खेड, रत्नागिरी विभागाकडे जाण्यासाठीचा महत्त्वाचा मार्ग आहे. हा मार्ग महाड तालुक्यातील टोळ गावाच्या फाट्याजवळ येऊन राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठी धोकादायक वळणे आहेत. पावसामुळे रस्त्यालगत असणाऱ्या साईडपट्टीवर गवताचे साम्राज्य पसरले आहे. तसेच अनेक ठिकाणी झाडांची मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे मार्गावर असणारे दिशादर्शक व माहिती फलक या गवतांमुळे व झाडांमुळे झाकून गेले आहेत, तर काही ठिकाणी असणारे फलक खराब झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरुन जाणाऱ्या - येणाऱ्या वाहन चालकांना वळणांचा अंदाज येत नसून ठिकठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे तसेच टोळ फाट्याजवळ माहिती फलकच नाही.