विद्युतवाहिनीस ग्रामस्थांचा विरोध, नेरळ-कळंब रस्त्यावरील कामाला स्थगिती देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 01:58 AM2019-06-26T01:58:04+5:302019-06-26T01:58:35+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून नेरळ-कळंब रस्त्याच्या साइडपट्टीवर एका खासगी गृहप्रकल्पासाठी अतिउच्च दाबाची भूमिगत विद्युतवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.

Demand for the suspension of electro-villagers, suspension of work on the Neral-Kalamb road | विद्युतवाहिनीस ग्रामस्थांचा विरोध, नेरळ-कळंब रस्त्यावरील कामाला स्थगिती देण्याची मागणी

विद्युतवाहिनीस ग्रामस्थांचा विरोध, नेरळ-कळंब रस्त्यावरील कामाला स्थगिती देण्याची मागणी

googlenewsNext

- कांता हाबळे 

नेरळ - गेल्या अनेक दिवसांपासून नेरळ-कळंब रस्त्याच्या साइडपट्टीवर एका खासगी गृहप्रकल्पासाठी अतिउच्च दाबाची भूमिगत विद्युतवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे; परंतु हे काम करत असताना कोणत्याही प्रकारे स्थानिक रहिवासी व शेतकऱ्यांना विचारात न घेता सुरू केले आहे. भविष्यात या केबलपासून नागरिकांंच्या जीवाला धोका असल्याने स्थानिकांनी हे काम अडविले असून कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार यांना निवेदन देऊन या कामाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी उपोषणाचा निर्धार केला आहे.
नेरळ-कळंब रस्त्यालगत भूमिगत इलेक्ट्रिक केबलकरिता रस्त्याची साइडपट्टी खोदण्याचे काम सुरू असून त्यामुळे प्रवासी व वाहनचालक यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मात्र, याची काहीच पर्वा न करता जेसीबी मशिनचा वापर करून या रस्त्याची साइडपट्टी खोदून अतिविद्युत दाबाची विद्युतकेबल टाकली जात आहे. या रस्त्याच्या सुधारणेकरिता शासनाने २ कोटी ८६ लाख रुपये इतका निधी खर्च केला आहे. तरीही या रस्त्याचे काम असमाधानकारक आहे. नेरळ-माथेरान-कळंब हा १०९ राज्यमार्ग आहे. या रस्त्यावर काही टप्प्यांवर काँक्रीटीकरण व गटारे व मोऱ्यांचे काम समाविष्ट असताना ते पूर्ण करण्यात आलेले नाही. कार्यदेशातील तरतुदीनुसार रस्त्याचे काम झाले नसल्याची तक्रार ग्रामस्थ व प्रवाशांनी केली आहे. या तक्रारींकडे लक्ष देण्यास बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना वेळ नाही. मात्र, खासगी व्यावसायिक प्रकल्पास विद्युतपुरवठा करण्याच्या दृष्टीने विद्युतवाहिनीस परवानगी दिली जाते. हे संतापजनक असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.
सुमारे पावणेतीन कोटींचा निधी शासनाने या रस्त्याकरिता खर्च केला आहे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांच्या हलगर्जीमुळे हा निधी पाण्यात गेला आहे. या रस्त्याची कार्यादेशानुसार सुधारणा झालेली नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी काहीच कार्यवाही करत नाहीत. मात्र, या रस्त्याचे काम झाल्यानंतर महिनाभरातच या रस्त्याची साइडपट्टी खोदण्यास सुरुवात केली आहे. एका खासगी व्यावसायिक प्रकल्पाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेतच भूभाडे भरून काम करावे अशा आशयाची परवानगी ७ जून रोजीच्या पत्राने मुख्य कार्यकारी अभियंता, पनवेल यांनी दिली आहे. गंभीर बाब अशी की, ही परवानगी मिळण्याच्या तीन दिवस आधीपासूनच या रस्त्याची साइडपट्टी खोदण्याचे काम कंपनीने सुरू केले होते.
हे काम करताना कोणत्याही नियम व अटींचे पालन ठेकेदार कंपनीने केलेले नाही. जेसीबी मशिनचा वापर करून रस्ता खोदल्याने त्याला तडे गेले आहेत. १.६५ मीटर खोल केबल टाकावयाची असताना केवळ एक ते दोन फूट खोदकाम करून केबल टाकली जात आहे. भूमिगत केबल टाकताना नियमानुसार कोणत्याही प्रकारची दक्षता घेतलेली नाही. रस्त्यानजीक वृक्षारोपण केलेली सर्व झाडे उकरून काढली आहेत. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल येथील मुख्य अभियंता सतीश श्रावणे यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

नेरळ-कळंब रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधालगत केबल टाकून अतिउच्च दाबाची विद्युतवाहिनी नेली जात आहे. मात्र, हे काम करताना ग्रामस्थ व शेतकरी यांची परवानगी घेतलेली नाही. हे काम रस्त्यालगत केले जात असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत केले जात असल्याचा दावा अधिकाºयांनी केला आहे तर ही जागा शेतकºयांच्या खासगी मालकीची असून आम्ही जागा रस्त्याकरिता दिली आहे. खासगी प्रकल्पाची विद्युतवाहिनी त्यातून नेण्याकरिता जागा दिलेली नाही, असे तमाम शेतकºयांचे म्हणणे आहे.

पोशीरमधील शेतकरी, ग्रामस्थांनी ही केबल टाकण्यास कडवा विरोध केला आहे. हे काम शेतकºयांची परवानगी न घेता बेकायदा केले जात आहे. खासगी व्यावसायिक प्रकल्पाकरिता शेतकरी व प्रवाशांचा जीव धोक्यात घालून सुरू असलेले काम त्वरित स्थगित करण्यात यावे व या कामाचे कार्यादेश रद्द करण्यात यावेत, अशी मागणी या शेतकºयांनी केली आहे.

नेरळ-कळंब रस्त्यालगत पोशीर गावाजवळ भूमिगत केबल टाकण्यास शेतकरी आणि स्थानिकांनी हरकती घेतल्या आहेत; परंतु त्यांच्या हरकतीचे निरसन झाल्याशिवाय काम सुरू करण्यात येणार नाही, सध्या हे काम बंद करण्यात आले आहे.
- आनंद घुळे,
उप अभियंता, महावितरण कर्जत

 

Web Title: Demand for the suspension of electro-villagers, suspension of work on the Neral-Kalamb road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड