पाली शहर समस्यांच्या विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:04 AM2019-07-18T00:04:44+5:302019-07-18T00:04:54+5:30

अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराचा विकास दिवसेंदिवस होत आहे.

In the city of Pali city problems | पाली शहर समस्यांच्या विळख्यात

पाली शहर समस्यांच्या विळख्यात

Next

- विनोद भोईर 
पाली : अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराचा विकास दिवसेंदिवस होत आहे. मागील काही वर्षांपासून विविध कारणांनी पालीचा विस्तार झाला आहे. लोकसंख्या वाढली आहे. मात्र येथील नाले व गटारे यांची नियोजनानुसार बांधणी व विस्तार झाला नाही. परिणामी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पाली शहरात सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न जटील बनत चालला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील आ वासून उभा राहिला आहे. संबंधितांनी या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुख्यालयाचे ठिकाण असल्याने पालीत आजूबाजूच्या गावातील लोक कामानिमित्त व मुलांच्या शिक्षणासाठी राहत आहेत. नोकरी व कामधंद्यानिमित्त आलेले अनेक लोक येथे स्थायिक झालेत. तसेच तालुक्याची मोठी बाजारपेठ असल्याने व्यापार व उद्योगाचे केंद्र बनले आहे. त्यामुळे मागील पाच ते दहा वर्षात पालीचा विस्तार चारही बाजूने झाला आहे. कौलारू घरे जाऊन इमारती व बंगले उभे राहिले. गावठाण जमिनीबरोबरच भोवतालच्या शेतजमिनी बिगरशेती करून तेथे नगरे व वसाहती निर्माण झाल्या आहेत. पण हे सर्व होत असताना सर्वात महत्त्वाची बाब दुर्लक्षित झाली आणि ती म्हणजे सांडपाणी व्यवस्था. पाली शहरात गटारे व नाले आहेत. मात्र कित्येक वर्षांपासून नवीन गटारे व नाले निर्माण झालेले नाहीत. असलेले नाले व गटारे खूपच अरुंद आहेत. तसेच त्यांची वेळीच योग्यप्रकारे साफसफाई व दुरुस्ती होत नाही. परिणामी आपल्या क्षमतेपेक्षा अधिक ताण ही गटारे व नाले झेलत आहेत. सगळ्यात गंभीर अवस्था आहे ती येथील बल्लाळेश्वर नगर, धुंदीविनायक नगर, चर्मकार वाड्याशेजारी झालेल्या नवीन वसाहती, इंदिरानगर येथील. येथे गटारे आणि नाले यांचे पुरेसे जाळेच नाही, तर काही ठिकाणी घरे व इमारतींचे सांडपाणी कोणत्याच मुख्य गटार किंवा नाल्याला जोडलेले नाही. ते थेट मोकळ्या जागेत सोडलेले आहे. येथील भाग उंच सखल देखील आहेत. परिणामी पावसाळ्यात येथे सर्वत्र सांडपाणी तुंबते.
पावसाळ्याच्या सुरुवातीस तात्पुरत्या स्वरूपात पालीमध्ये नालेसफाईला सुरुवात होते. मात्र वर्षभर नाले व गटारे पाणी बॉटल, प्लॅस्टिकच्या पिशव्या, घरगुती कचरा, गाळाने भरतात. आणि सफाई केल्यावरही काही नागरिक पुन्हा गटारे व नाल्यात कचरा टाकतात. परिणामी पावसाळ्यात नाले गटारे तुंबतात. या तुंबलेल्या गटारांमुळे सर्वत्र घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरते व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. या त्रासामुळे जनतेसह भाविकही बेजार झाले आहेत.
यावर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांसह येणाऱ्या भाविकांकडून होत आहे.
>अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा
सुधागड तालुक्याचे मुख्यालय व अष्टविनायकाचे स्थान असलेल्या बल्लाळेश्वराच्या पालीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खडतर व खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांसह वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याआधी ठिकठिकाणी फुटलेल्या रस्त्यांवर आता पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यांचा आकार व खोली दुपटीने वाढली आहे. यामुळे नागरिकांसह बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांची मोठी गैरसोय होत आहे.
स्टेट बँकेपासून महाकाली मंदिरापर्यंतचा रस्ता हिवाळ्यात ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आला. मात्र ग्रामपंचायतीकडे रस्ते दुरुस्ती व देखभालीसाठी निधी उपलब्ध नसल्याने त्यावेळी इतर रस्ते दुरुस्त करता आले नाहीत असे ग्रामपंचायती मार्फत सांगितले. येथील सावंत आळी, राम आळी व मधल्या आळीपासून बल्लाळेश्वर मंदिरापर्यंतचा रस्ता, तसेच भोई आळी, बसस्थानक रस्ता देखील खराब झाला आहे. बस स्थानकाजवळील मार्गावर तर आता भले मोठे खड्डे पडले आहेत. येथून जाणाºया सर्व बस व खाजगी वाहने हमखास या खड्ड्यांमध्ये आदळतात. त्याचबरोबर बल्लाळेश्वर नगर, धुंडीविनायक नगर व शिळोशी आणि मढाळी गावाकडे जाणाºया रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. जिल्हा परिषद शाळा व टॉपवर्थ हायस्कूलकडे जाणाºया रस्त्याची देखील अवस्था बिकट आहे. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते तसेच ते रस्त्यावर देखील साठते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पालीत येणाºया भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना त्रास होतो. वाहन चालविताना अनेक अडचणी येतात. खड्ड्यात पाणी असल्याने व त्यामुळे अंदाज न आल्याने काही ठिकाणी वाहन जोरात खड्ड्यात आदळते. खड्ड्यातून बाहेर आलेल्या खडीमुळे वाहने घसरतात. दुचाकीस्वारांचा तर खड्डे चुकविताना अनेक वेळा तोल जातो. तसेच भाविक, विद्यार्थी व पादचाऱ्यांना येथून मार्ग काढताना अडचणी येतात. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांना खराब रस्त्याचा त्रास होतो. लवकरात लवकर पालीतील रस्ते खड्डेमुक्त करावेत अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.
येथील भोई आळी, आगर आळी, राम आळी, खडक आळी, कुंभार आळी, मधली आळी, सोनार आळी, कासार आळी, बल्लाळेश्वर नगर, बेगर आळी, वरचा देऊळवाडा, कासार आळी व बल्लाळेश्वर मंदिराच्या भोवतालच्या परिसरातील नाले व गटारे वारंवार तुंबतात.
एवढेच काय तर तेथील गटारे व नाल्यांची अवस्था बिकट झाली आहे. साठलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात घाण व दुर्गंधी पसरली आहे. तसेच डासांचा उपद्रव वाढतो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नालेसफाई व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांनाही या घाणीचा व दुर्गंधीचा त्रास होत आहे.
पावसाळ्यात तर या तुंबलेल्या नाल्याचे व गटाराचे पाणी रस्त्यावर येवून पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. तसेच रोगराईला आमंत्रण मिळते. अशी परिस्थिती अजून किती दिवस झेलायची? असा प्रश्न सामान्य नागरिक करतात.

Web Title: In the city of Pali city problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.