किल्ल्याचे पावित्र्य अबाधित राखण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न, रायगड प्रदक्षिणेत खा. संभाजीराजे छत्रपती होणार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 18:33 IST2017-12-01T17:04:01+5:302017-12-01T18:33:42+5:30
रायगड किल्ल्याचे पावित्र्य अबाधित राखण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिले आहे. युथ हॉस्टेल आयोजित रायगड प्रदक्षिणेत प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

किल्ल्याचे पावित्र्य अबाधित राखण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न, रायगड प्रदक्षिणेत खा. संभाजीराजे छत्रपती होणार सहभागी
- जयंत धुळप
अलिबाग : रायगड किल्ल्याचे पावित्र्य अबाधित राखण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिले आहे. युथ हॉस्टेल आयोजित रायगड प्रदक्षिणेत प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य शाखा आणि युथ क्लब, महाड यांच्या संयूक्त विद्यमाने येत्या 24 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, संजीव मेहता, संतोष सकपाळ, राजेश बुटाल व अनंत देशमुख यांनी रायगड पायाथ्याशी पाचाड येथे शुक्रवारी खा. संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली व त्यांना रायगड प्रदक्षिणेचे निमंत्रण दिले. निमंत्रण स्वीकारुन प्रदक्षिणेत प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदक्षिणेच्या मार्गाचे सुशोभीकरण व आधुनिकीकरण करताना या मार्गाचे नैसर्गिक सौंदर्य कमी होऊ नये तसेच किल्यांचे पावित्र्य अशा आधुनिकीकरणामुळे कमी होणार नाही या बाबत अधिकाधिक काळजी घ्यावी, अशा भावना या सभासदांनी व्यक्त केल्या. या भावनांशी आपण सहमत असल्याचे खा. संभाजीराजे छत्रपती यांनी सांगून या बाबत सर्वती दक्षता घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. ही राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा रविवार दि. 24 डिसेंबर रोजी संपन्न होत असून राज्यातून गडप्रेमींनी त्यात आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन यानिमित्ताने संजीव मेहता यांनी केले आहे.