Women's Day 2019 : हाेय... आम्हाला राजकारण करायचंय !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 08:32 PM2019-03-08T20:32:59+5:302019-03-08T20:36:09+5:30

राजकारणातच करिअर करायचं असं म्हणणाऱ्या काही युवती असून त्यांना राजकारणात येऊन एक आदर्श समाज घडवायचा आहे.

Women's Day 2019: yes ... we want to do politics! | Women's Day 2019 : हाेय... आम्हाला राजकारण करायचंय !

Women's Day 2019 : हाेय... आम्हाला राजकारण करायचंय !

Next

पुणे : राजकारण हे पैसेवाल्यांच काम आहे. आपल्याला जमणार नाही, अशी सर्वसामान्य लाेकांची धारणा असते. राजकारण नकाेच असाच काहीसा सूर सामान्य कुटुंबातून उमटत असताे. त्यातही जर मुलीनेे राजकारण करायचं म्हंटलं तर अनेकदा घरुन तीव्र विराेध हाेत असताे. हे चित्र आता बदलण्यास सुरुवात झाली आहे. राजकारणातच करिअर करायचं असं म्हणणाऱ्या काही युवती असून त्यांना राजकारणात येऊन एक आदर्श समाज घडवायचा आहे. संध्या साेनवणे, शर्मिला येवले आणि कल्याणी माणगावे या पुण्यात शिक्षण घेणाऱ्या तरुणी राजकारणाकडे करिअर म्हणून पाहतायेत. 

सध्या पुण्यातील विविध महाविद्यालयांमध्ये या तिघी शिक्षण घेत आहेत. डाॅक्टर, इंजिनिअर, वकील हे पारंपारिक करिअरचे पर्याय न निवडता या तरुणींनी राजकारणात करिअर करण्याचे ध्येय मनाशी बांधले आहे. राजकारण हे केवळ पुरुषांनी करायचे, पैसेवाल्यांचे काम असल्याचा समज त्या पुसून टाकण्यासाठी पाऊले टाकत आहेत. त्यांचे विचार पक्के आहेत आणि त्यांची वाटचालही ठरली आहे. व्यवस्था बदलण्यासाठी युवकांनी राजकारणात येणे गरजेचे असल्याचे त्या म्हणतात. मुलगी ही मुलापेक्षा कुठेही कमी नाही मग ते राजकारण का असेना, त्यामुळे यात करिअर करण्यासाठी आणि राजकारणात माेठी पदे भूषवण्यासाठी त्या कष्ट करण्यास तयार आहेत. 

संध्या ही राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसची अहमदनगरची जिल्हाध्यक्ष म्हणून काम करते, संध्या राजकारणात करिअर करण्याबाबत म्हणते, राजकारणात पुरुषांची मक्तेदारी आहे, असं आपण आजपर्यंत ऐकत आलाे आहे. ज्या महिला राजकारणात आहेत त्या सुद्धा याेगायाेगाने किंवा राजकारणी कुटुंब असल्याने राजकारणात आल्याचे सांगतात. परंतु मी राजकारणाकडे एक करिअर म्हणून पाहत आहे. लहानपणीची करिअर बाबतची स्वप्ने वेगळी असतात. परंतु ज्यावेळी  महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपण नेतृत्व करु शकताे, एखाद्या मुद्दा मांडू शकताे, तसेच आपण सामान्य जणांचा आवाज बनू शकताे असे जेव्हा वाटले तेव्हा राजकारणातच करिअर करायचे असे मनाशी पक्के ठरवले. आपल्यातील गुणांना आपण वाव दिल्यास राजकारणात देखील महिला आपला वेगळा ठसा उमटवू शकतील. राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या युवक युवतींना मला सांगावेसे वाटते की राजकारण म्हंटलं की तेथे प्रस्थापितांचं वर्चस्व असतं, आपला तेथे निभाव लागणार का असा न्यूनगंड बाळगण्याची अजिबात गरज नाही. आपल्या काैशल्याच्या जाेरावर तसेच आपल्या प्रश्नांवर आवाज उठवत तुम्ही या क्षेत्रात यायला हवे. परिणामी तुमच्या मागण्यांंसाठी रस्त्यावर उतरण्याची गरज जरी पडली तरी रस्त्याावर उतरा. नक्कीच तुमची राजकारणात याेग्य ती दखल घेतली जाईल. 

स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करणारी शर्मिला येवले म्हणते, लहानपणीपासूनच शेतकरी चळवळ पाहत आली आहे. माझ्या आजूबाजूला सगळे चळवळीचे वातावरण हाेते. वयाच्या 12 व्या वर्षी आंदाेलनात सहभाग घेतला. पुढे जाऊन आपणही नेतृत्व करु शकताे हे लक्षात आले. आपल्याकडे ज्ञान असेल तर त्याचा वापर आपण नक्कीच करु शकताे. त्यामुळे मी राजकारणात यायचे ठरवले. सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्यांचा पाठपुरावा केला आहे. कुठलिही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ आपण नेतृत्व करु शकताे या आत्मविश्वासावर मी राजकारणात पाऊल ठेवले आहे.ज्यांना राजकारणात यायचे आहे त्यांना एवढंच सांगिन की राजकारण हे वाईट नाही. तुम्ही जर तुमचे प्रश्न, तुमची महत्त्वकांक्षा घेऊन या क्षेत्रात आला तर तुम्ही नक्कीच चांगले काम करु शकाल.  

महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेसची पश्चिम महाराष्ट्र युवती समन्वयक कल्याणी माणगावे म्हणते, सामान्य कुटुंबातून राजकारणात येणाऱ्या मुलीला कुठलाही राजकीय वारसा नसताे. त्यामुळे व्यक्ती व्यक्तीपर्यंत पाेहचणे हा माेठे चॅलेंज असते. अनेकदा एक मुलगी आपले प्रश्न साेडवू शकणार नाही असा समाजाचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकाेन असताे. नावाला केवळ महिला राजकारणात आहेत हा समज जर बदलायचा असेल तर युवतींनी पुढे येऊन राजकारणात भाग घ्यावा लागेल. त्याचबराेबर लाेकांमध्ये जाऊन काम करणे गरजेचे आहे. राजकारणात येऊन खूप पैसे मिळवायचे हा दृष्टिकाेन राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी बदलायला हवा. हे पैसे मिळविण्याचे नाही तर समाजसेवेचे क्षेत्र आहे. राजकारण म्हणजे सामान्यजणांचे प्रश्न देशातील सर्वाेच्च सदनात मांडण्याची तुम्हाला संधी असते. लाेकांचे राहिणीमान तुम्हाला उंचवायचे असेल तर तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी पाहिजे. राजकारणात स्पर्धा असली तरी तुमची जर काम करण्याची वृत्ती असेल तर तुम्ही राजकारणात नक्की यशस्वी हाेऊ शकाल. 

Web Title: Women's Day 2019: yes ... we want to do politics!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.