सोमवारपासूनच होणार पाणीकपात , पेठांना बसणार सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 12:56 AM2018-10-24T00:56:26+5:302018-10-24T00:56:54+5:30

दिवाळीआधीच म्हणजे येत्या सोमवारपासूनच (दि. २९) शहरात पाणीकपात होणार आहे.

The water crisis will take place on Monday | सोमवारपासूनच होणार पाणीकपात , पेठांना बसणार सर्वाधिक फटका

सोमवारपासूनच होणार पाणीकपात , पेठांना बसणार सर्वाधिक फटका

Next

पुणे : दिवाळीआधीच म्हणजे येत्या सोमवारपासूनच (दि. २९) शहरात पाणीकपात होणार आहे. संपूर्ण शहराला सलग ५ तास मात्र एकच वेळ पुरेशा दाबाने पाणी मिळेल असे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. याचा सर्वाधिक मोठा फटका शहराच्या मध्यभागातील पेठांना बसणार आहे.
महापौर मुक्ता टिळक यांनी या निर्णयाची माहिती दिली. ही पाणीकपात नाही तर उपलब्ध पाण्याचे सर्वांना समान वाटप व्हावे यासाठी नियोजन केले असल्याचा दावा त्यांनी केला. पाटबंधारे खात्याकडून दररोज १ हजार ३५० एमएलडी पाणीच उचलले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र कालवा समितीच्या बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत महापालिकेला रोज १ हजार १५० एमएलडीच पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. सध्या मिळते आहे तेवढेच पाणी घेतले जाणार असेल तर मग पाण्याचे हे समान वाटप कशासाठी, या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर महापौर टिळक व महापालिका आयुक्त सौरव राव यांना देता आले नाही.
पर्वती ते लष्कर पाणीपुरवठा केंद्रापर्यंतचे बंद जलवाहिनीचे काम १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर रोज १०० एमएलडी पाणी वाचणार आहे. त्याशिवाय पाण्याची अन्य ठिकाणीची गळतीही थांबवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे आयुक्त राव यांनी सांगितले. कालवा समितीच्या सभेत ग्रामीण तसे शहरी भागालाही उपलब्ध पाण्याचे योग्य वाटप व्हावे, त्यासाठी पाणी काटकसरीने वापरण्याचा निर्णय झाला. त्याला अनुषंगून शहरातील पाणीवाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. शहरात काही ठिकाणी ८ तास पाणी, तर काही ठिकाणी २ तास असे पाणी मिळत होते. त्यामुळे हा बदल केला. आता संपूर्ण शहरात एक वेळ सलग ५ तास पाणीपुरवठा होईल. त्याचे वेळापत्रक तयार आहे. ते दोनच दिवसांत जाहीर होईल, असे महापौरांनी सांगितले. धरणात पाणी आहे व पाटबंधारे खात्याकडून सध्या मिळते आहे तेवढेच म्हणजे १ हजार ३५० एमएलडी पाणीच मिळणार असतानाही महापालिकेने हा बदल केला आहे. सध्या ८ तास व दोन वेळा पाणी मिळत असणाऱ्या भागाला यामुळे आता एकच वेळ पाणी मिळणार आहे, तरीही ही कपात नाही असे कसे, असा प्रश्न विचारला असता महापौर टिळक म्हणाल्या, ‘‘८ तास पाणी मिळत असले तरी ते पुरेशा दाबाने मिळत नव्हते. आता ५ तास मिळणार असले तरी ते पुरेशा दाबाने मिळणार आहे. त्यासाठी तांत्रिक विभागाकडूनही यंत्रणेत काही बदल केले आहेत. याला कपात म्हणता येणार नाही.’’ या वेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता प्रवीण गेडाम आदी उपस्थित होते.
समान पाणीपुरवठा करण्यासाठी काही तांत्रिक बदल करावे लागणार आहेत. त्यात पाणी साठवण टाक्यांची पाण्याची लेवल, कोणत्या टाकीत कधी किती पाणी ठेवायचे, कधी सोडायचे अशा स्वरूपाचे हे बदल आहेत.
कोणत्या केंद्रांचे पंपिग कधी सुरू ठेवायचे व कधी बंद करायचे हेही यात नव्याने ठरवण्यात आले आहे. पाणी सोडणाºया व्हॉल्वमनमुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या वेळा कमी-जास्त होतात. सगळीकडे समान पाणी मिळावे यासाठी प्रसंगी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले.
>पुणेकरांवर ८८ कोटीपर्यंत पाणीपट्टीचा भार
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने (एमडब्ल्यूआरआरए) पाण्याचे नवीन दर
लागू केले आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिकेला जलसंपदा विभागाकडे जमा करावी लागणारी पाणीपट्टीची रक्कम ३० कोटी रुपयांवरून सुमारे ८८ कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे. पुणेकरांकडून जेवढे अधिक पाणी वापरले जाईल तेवढ्या अधिक प्रमाणात पाणीपट्टीच्या रकमेत वाढ होणार आहे. त्यामुळे यापुढील काळात पाणी जपूनच वापरावे लागणार आहे. पुणे महानगरपालिकेकडून क्षमतेपेक्षा अधिक पाणी वापरले जात असल्यामुळे जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांपासून अधिकाºयांपर्यंत सर्वांकडूनच टीका केली जाते. काही दिवसांपूर्वी तर जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी पोलिसांना बरोबर घेऊन पालिकेचे पाणी पंपच बंद केले. त्यात यंदा दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे पालिका प्रशासनाने पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुणेकरांना नेहमीपेक्षा कमी पाणी वापरण्यास मिळणार आहे. मात्र, एमडब्ल्यूआरआरएने पाण्याचे नवीन दर लागू केले आहेत. त्यानुसार पालिकेकडून जलसंपदा विभागाकडे जमा केल्या जाणाºया पाणीपट्टीच्या रकमेत दुपटीपेक्षा अधिक
वाढ होणार आहे. पुणे महानगरपालिकेकडून जलसंपदा विभागाला दरवर्षी शहराच्या लोकसंख्येची माहिती कळविली जाते. त्यानुसार जलसंपदा विभागातर्फे पलिकेला पाणी दिले जाते. पालिकेने कालव्यातून पाणी घेतल्यास प्रतिहजार लिटरसाठी ५० पैसे दराने, तर धरणातून पाणी घेतल्यास २५ पैसे प्रतिहजार लिटर दराने पाणीपट्टी वसूल केली जाते.त्याचप्रमाणे एमडब्ल्यूआरआरएने निश्चित केलेल्या मानांकनानुसार प्रतिव्यक्ती १५५ लिटर एवढे पाणी पालिकेला देण्यात येते. मात्र, पालिका प्रशासनाकडून यंदा पुणे शहराची लोकसंख्या नेमकी किती आहे, याबाबतची माहिती अद्याप जलसंपदा विभागाला कळवलीच गेली नाही. त्यामुळे गेल्या वर्षाच्या लोकसंख्येच्या आधारे पालिकेला पाणी दिले जात आहे. निश्चित क्षमतेपेक्षा कोणत्याही शहराला ११५ टक्क्यांपर्यंत पाणी वापरता येते. मात्र,११५ ते १४० टक्क्यांपर्यंत पाणी वापरल्यास दीडपट पाणीपट्टी वसूल करण्याचा नियम आहे. तसेच १४० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीवापर केल्यास दुप्पट दराने पाणीपट्टी द्यावी लागणार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत पालिका प्रशासनाने क्षमतेपेक्षा अधिक पाण्याचा वापर केल्याचे दिसून येत आहे.
>व्यावसायिक
वापरासाठी पाणी
पिण्याचे पाणी सोडून हॉटेल्स व इतर औद्योगिक वापरासाठी ९९ एमएलडी पाणी घेण्याबाबत पालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाकडे शपथपत्र दिले. व्यावसायिक वापरासाठी वेगळे दर आहेत. धरणातून पाणी घेतल्यास ४.८० रुपये प्रतिहजार लिटर आणि कालव्यातून पाणी घेतल्यास ९.६० रुपये प्रतिहजार लिटर पाण्याचे दर आहेत. त्यामुळे पालिकेला व्यावसायिक वापराच्या पाण्याची वेगळी पाणीपट्टी भरावी लागत आहे.
>कालव्यातून पाणी घेणे पडते
महागात
धरणातून कालव्यात सोडलेले पाणी घेतल्यास प्रतिहजार लिटर ५० पैसे हा दर आहे. तर थेट धरणातून पाणी उचलल्यास २५ रुपये दर आहे. मात्र, लष्कर भागासह आणखी काही जलशुद्धीकरण केंद्रासाठी कालव्यातून पाणी उचलले जाते. मात्र, पालिकेने सर्व पाणी धरणातून उचलल्यास पाणीपट्टी निम्म्याने कमी होऊ शकते.
> महापौर म्हणाल्या...
ही कपात नाही तर नियोजन आहे.
सलग पाच तास पाणी मिळेल
तांत्रिक साह्य घेतल्यामुळे पाणी पुरेशा दाबाने मिळेल
संपूर्ण शहराला समान पाणीपुरवठा होईल.
पाटबंधारेकडून १ हजार ३५० च पाणी घेणार
> आयुक्त म्हणाले...
पाटबंधारेकडून १ हजार ३५० एमएलडी पाणी मिळत असले तरीही ते अनेक संस्थांनाही द्यावे लागते. त्यामुळे ते कमी मिळते. ते वजा करण्यात येणार आहे.पर्वती ते लष्कर जलवाहिनीचे काम १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर रोज १०० ते १५० एमएलडी पाण्याची बचत होणार आहे.
कालव्यातून पाणी येताना होणारी गळती थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पाणी सोडणारे व्हॉल्वमन चुकत असतील तर कारवाई करणार
सरकारी आस्थापनांची थकलेली पाणीपट्टी वसूल करणार. पाटबंधारेची थकबाकी असेल तर तीही वसूल करू
शहराचे विभाग करून त्यानुसार पाणीसाठवण टाक्या भरणार
>नियोजन कसले, ही कपातच
धरणामध्ये २६ टीएमसी पाणी असतानाही पुणेकरांना पाण्याची कपात सहन करावी लागणार आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला पाण्याचे नियोजन जमत नाही हेच यावरून सिद्ध होते. हिंमत असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पुणेकरांच्या वतीने ठणकावून सांगावे, की खडकवासला धरणातून आम्ही सध्या घेतो आहे तेवढेच पाणी घेणार.
- चेतन तुपे, विरोधी पक्षनेता

Web Title: The water crisis will take place on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे