वाहतूक पोलीस विभागाचा सावळा गोंधळ; चारचाकी चालकाला हेल्मेट न घातल्याचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 08:27 PM2020-01-17T20:27:08+5:302020-01-17T20:32:57+5:30
दुचाकीस्वाराने नियम मोडल्याचा दंड रिक्षा चालकाला...
पुणे :वाहतूक पोलिस विभागाने हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वाराच्या दंडाचे ई-चलन कार मालकाला दिले आहे. तसेच, दुचाकीस्वाराने नियम मोडल्याचा दंड रिक्षा चालकाला दिला आहे. यामुळे न केलेल्या गुन्ह्यासाठी वाहतूक पोलिस विभागाच्या चकरा माराव्या लागत आहे. वाहतूक पोलिस विभागाच्या या तांत्रिक सावळ्या गौंधळामुळे नागरिकांना मनस्ताप होऊ लागला आहे.
वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरा लावले आहेत. या सीसीटीव्हीच्या आधारे हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे, मद्यपान करून गाडी चालवणे, सिग्नल न पाळणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, परवाना नसताना गाडी चालवणे आदी विविध गुन्हे करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. वाहनाच्या नंबरच्या आधारे वाहतूकीचे नियम मोडणा-यावर सीसीटीव्हीच्या आधारे गुन्हा दाखल करून ई चलन व्दारे दंड वसूला केला जात आहे. मात्र, अनेकदा वाहतूकीचे नियम तोडतो एकजण, ई चलनव्दारे दंड दुस-याच गाडीच्या नंबरवर पाठवण्याचे प्रकार होत आहे. या तांत्रिक गौंधळामुळे वाहतूकीच्या नियमाचे पालन करणा-या नागरीकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नगररोड-वडगावशेरी क्षैत्रिय कार्यालयाचे वरिष्ठ लिपीक अशोक शिरसाठ यांना हेल्मेट न घातल्याचा दंड वाहतूक विभागाने ई चलनव्दारे पाठवला आहे. त्यांचा कडे मारूती व्हॅगनर ही चारचाकी आहे. त्यांच्या चारकाची वाहनाच्या नंबरवर हे ई चलन आले आहे. न केलल्या गुन्हा बद्दल वाहतूक विभागाने चलन पाठवल्यामुळे शिरसाट हैराण झाले आहे. या प्रमाणेच वडगाव शेरीतील सुरेश गलांडे यांच्याकडे रिक्षा आहे. ते कधीच दुचाकी चालवत नाही. तरी, वाहतूक विभागाने दुचाकीस्वारांने नियम मोडल्याचा दंड ई चलनव्दारे रिक्षाच्या नंबर वर पाठवले आहे. गलांडे यांनी वाहतूक पोलिस उपआयुक्तांच्या कार्यालयामध्ये जाऊन दंड कमी करून घेतला आहे. तसेच, वडगाव शेरी तील प्रशांत हंबीर यांच्या कडे स्विफ्ट चारचाकी वाहन आहे. पार्किगमध्ये चुकीच्या पध्दतीने गाडी लावल्या प्रकरणी त्यांना ई चलन आले आहे. मात्र, त्या ई चलनामध्ये बीएमडब्लू ही गाडी आहे. ज्या गाडीचा नंबर दुसरा आहे.
याबाबत उपर पोलिस उपायुक्त वाहतूक डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले की, सीसीटीव्ही कॅमेरामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. ई चलन पाठवताना काही तांत्रिक गोंधळ झाला असेल. तर, ती चुक दुरूस्त करण्यात येईल. वाहतूकीच्या नियमाचे पालन करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही. चुकीचे चलन आले असले.तर त्याबद्दल चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.