नीरा-भीमा दुर्घटनेप्रकरणी सोमा इंटरप्रायजेसच्या कर्मचाऱ्यांच्या पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 13:21 IST2017-11-25T13:18:43+5:302017-11-25T13:21:26+5:30
सोमा कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांना सोमवार (दि.२७) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भानुदास पवार यांनी दिली आहे.

नीरा-भीमा दुर्घटनेप्रकरणी सोमा इंटरप्रायजेसच्या कर्मचाऱ्यांच्या पोलीस कोठडीत वाढ
अकोले : येथील नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या बोगद्यातील दुर्घटनेप्रकरणी येथील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेल्या सोमा कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांना सोमवार (दि.२७) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भानुदास पवार यांनी दिली आहे.
अकोले (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या बोगद्यामध्ये अपघात होऊन आठ कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भानुदास विठ्ठल पवार यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार क्रेन आॅपरेटर रामबहादूर रामाआसरे पाल, नवीन कुमार रविदत्त शर्मा, मुरलीकृष्णा शिवाजीराव मेहरदरा मेठला व श्रीधर वाल्हेश्वराव वेझढला या चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना इंदापूर येथील न्यायालयांमध्ये हजर करण्यात आले होते. न्यायालयाने प्रथम दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि. २४) भिगवण पोलिसांनी आरोपींना इंदापूर न्यायालयात हजर करुन दुर्घटनेचा तपास करण्यासाठी, कागदपत्रांची पूर्तता, कर्मचाऱ्यांची पात्रता, घटनेचा तपास, तज्ज्ञ समितीचा अहवाल मिळेपर्यंत आरोपींना आणखी पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. पोलिसांची मागणी मान्य करत न्यायालयाने आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.