सरसंघचालक डॉ. मोहन भागवत चार दिवसांच्या पुणे भेटीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 14:20 IST2017-11-08T14:19:18+5:302017-11-08T14:20:37+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे चार दिवसांच्या पुणे भेटीवर येत आहेत. गुरूवार, ०९ ते रविवार, १२ नोव्हेंबर २०१७ दरम्यान प्रवास नियोजित आहे.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत चार दिवसांच्या पुणे भेटीवर
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे चार दिवसांच्या पुणे भेटीवर येत आहेत. गुरूवार, ०९ ते रविवार, १२ नोव्हेंबर २०१७ दरम्यान त्यांचा हा पुणे प्रवास असणार आहे.
हा पुणे प्रवास सरसंघचालकांच्या नियोजित प्रवासाचाच भाग असून ते या प्रवासादरम्यान विविध पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकींना उपस्थित राहून ते मार्गदर्शन करणार आहेत. या प्रवासातील तीन दिवस म्हणजेच गुरूवार, ०९ रोजी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील एका सेवेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवार १० व शनिवार, ११ नोव्हेंबर रोजी तळेगाव येथील नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर चौथ्या दिवशी रविवार, १२ नोव्हेंबर रोजी मयुर कॉलनी, कोथरूडमधील बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात होणार्या महाराष्ट्र राज्य समन्वय बैठकीला उपस्थित राहून ते मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान या बैठकीत महाराष्ट्रातील संस्था व संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. प्रतिवर्षी व विविध शहरांमध्ये होणारी ही बैठक यंदा पुण्यात होते आहे.
संघ विचाराने प्रेरित होऊन काम करणार्या महाराष्ट्रातील विविध संस्था व संघटनांच्या कामांचा आढावा, संघटनात्मक वाढ, सेवा कार्यांची स्थिती, पुढील संकल्प याविषयी विस्ताराने चर्चा करण्यात येणार आहे. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह विनायक थोरात यांनी कळविली आहे.